लातूर - कोरोना म्हटले, की सध्या अंगावर काटा उभा राहतो. मात्र याला घाबरायची गरज नाही. कारण वेळेवर उपचार केल्यास तो बरा होतो. लक्षणे दिसताच ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेतल्यास कोरोना पूर्णपणे बरा होतो. असाच अनुभव वयाची १०० वर्ष पूर्ण झालेल्या काटगाव तांडा तालुका लातूर येथील धेनु उमाजी चव्हाण वय वर्ष १०५ व त्यांच्या पत्नी मोताबाई चव्हाण वय ९५ यांना आला. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले. अवघ्या सात दिवसात कोरोनाच्या आजारावर मात करून ते घरी परतले. त्यामुळे कोरोनाला घाबरु नका, असा संदेश कोरोनावर मात केलेल्या १०५ वर्षीय धेनु चव्हाण यांनी दिलाय.
लातूर तालुक्यातील काटगाव तांडा येथील रहिवासी असलेल्या चव्हाण दांपत्यास कोरोनाची लागण झाल्याने हे कुटुंब प्रचंड तणावात होते. घाबरून गेले होते. त्यांचे पुत्र सुरेश चव्हाण यांनी त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ शैलेंद्र चौहान, डॉ. गजानन हलकांचे, डॉ. धर्माधिकारी यांनी या १०० पार केलेल्या कोरोना रुग्णांवर योग्य रितीने उपचार केले. अवघ्या सात दिवसात तंदुरुस्त करून त्यांना घरी पाठवले आहे. आज हे दोन्ही ज्येष्ठ नागरिक ठणठणीत असून कोरोनाला घाबरु नका उपचार योग्य घेतल्यास तंदुरुस्त होतो, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या दाम्पत्याचा मुलगा सुरेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कोरोनाच्या भीषण संकटात सापडलेल्या माझ्या आई वडिलांना कोरोना झाल्याची घटना कळाली आणि मन सुन्न झाले. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारात व्हेंटिलेटर लावल्याने खूप घाबरुन गेलो होतो. मात्र डॉक्टरांनी मात्र संयम बाळगावा उपचार योग्य रितीने होऊन जाईल असा सल्ला दिला. अवघ्या सात दिवसात १०० वर्ष पूर्ण केलेल्या माझ्या आई वडिलांना कोरोनातून मुक्त करून डिस्चार्ज मिळाला. त्यांनी याबद्दल डॉक्टरांचे आभार मानले.
हेही वाचा - कोरोनातील माणुसकी: कोरोनाबाधित मातेच्या नवजात बाळाचा मैत्रिणीने केला सांभाळ