कोल्हापूर - यावर्षीच्या अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले. यामुळे, शेती, पिकपाणी तसेच रस्ते, वाहतुकीचेदेखील प्रचंड नुकसान झाले. याच पाण्यात पन्हाळा गडावर जाणारा मार्गही खचला. यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे गडावर पर्यटकांचे येणे बंद झाले आणि परिणामी येथील झुणका भाकरीची केंद्रही ओस पडू लागली होती. मात्र, ३ महिन्यानंतर, गडावर जाणारा रस्ता परत सुरू झाल्याने पर्यटकांची हळूहळू गर्दी वाढायला लागली, आणि आता झुणका भाकरी केंद्रावरही गर्दी दिसू लागली आहे.
पन्हाळा आणि इथे मिळणाऱ्या झुणका भाकरीच एक वेगळंच समीकरण आहे. पन्हाळ्यावर येणारा प्रत्येकजण झुणका भाकरी खाल्ल्याशिवाय परत जातच नाही. मात्र, यंदाच्या महापुराचा इथल्या अनेक व्यावसायिकांवर चांगलाच परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. गडावर जाणारा मुख्य रस्ताच खचल्याने अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पर्यटकच येऊ शकत नसल्याने झुणका भाकरीचे सर्वच स्टॉल ओस पडले होते. पण, तब्बल साडे तीन महिन्यांनंतर पन्हाळा गडावर एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ओस पडलेल्या झुणका भाकर व्यावसायिकांच्या तव्यावर पुन्हा भाकरी परतू लागल्या आहेत.
हेही वाचा - कोल्हापुरातील 'या' छोट्याशा गावात स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग
गेल्या 3 महिन्यांपासून गडावर येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दरम्यान अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र, ४ दिवसांपूर्वीच वाहतूक सुरू झाल्याने आता पर्यटकांचा पन्हाळा गडाकडे ओघ वाढला आहे. त्यामुळे झुणका भाकरी व्यवसायिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य रस्ताच मोठ्या वाहनांसाठी बंद असल्याने अनेक पर्यटक इच्छा असूनही पन्हाळा गडावर येऊ शकत नव्हते. मात्र, रस्ता परत एकदा सुरू झाल्याने पन्हाळ्यावर आलेले पर्यटक झुणका भाकरीवर ताव मारताना पाहायला मिळत आहेत. पन्हाळा गडावर आता पर्यटकांचा ओघ वाढल्याने झुणका भाकरी केंद्रावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो आहे.
हेही वाचा - राधानगरीतील तरुणीच्या मृत्यूचे गूढ उकलेले, आत्महत्या नैराश्येतूनच