कोल्हापूर - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राहुल कदम यांना किणी टोल नाक्यावर धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून त्यांनी धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. विजय शामराव शेवडे (रा. घुणकी, ता. हातकणंगले) यासह एका अनोळखी कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आम्ही पोलीस आणि आयएएस अधिकाऱ्यांना विकत घेवू शकतो असा दम देखील टोलच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिला. लोकसभा कामकाज आटोपून कोल्हापूरला परत येत असताना रात्री साडेअकरा वाजता ही घडली घटना आहे. अमन मित्तल यांनी तात्काळ पेठवडगाव पोलीस ठाण्यात संबंधित दोन टोल कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
कालच महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत अशा पद्धतीची घटना कोल्हापुरात घडली होती. त्यात आज टोल नाक्यावर हा प्रकार घडल्याने अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई होण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.