कोल्हापूर Zika Virus Patient In Kolhapur : डासांपासून फैलाव होत असलेल्या झिका व्हायरसचं संकट कोल्हापूरकरांना भेडसावत आहे. शहरासह उपनगरात झिका व्हायरसचा प्रादूर्भाव वाढत आहे. कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. घर टू घर सर्वेक्षण केलं जात असून शहरातील 1 हजार 494 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात तापाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येणार आहेत. आरोग्य विभागातर्फे 392 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं तर 243 गरोदर मातांचीही तपासणी करण्यात आल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन : नागरिकांनी परिसरात साठवलेल्या निकामी, निरुपयोगी वस्तू नष्ट करुन परिसर स्वच्छ करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. इमारतीवरील तसेच जमिनीखालील पाण्याच्या टाक्यांत डासोत्पत्ती होऊ नये, यासाठी घट्ट झाकण बसवावे. खिडक्यांना तसेच व्हेंट पाईपला डास प्रतिबंधक जाळ्या बसवाव्यात, दिवसा झोपतानादेखील मच्छरदाणीचा वापर करावा. झिका आजारासंदर्भात गरोदर मातांनी डासांपासून संरक्षणासाठी सर्वतोपरी काळजी घ्यावी, असंही आवाहन महापालिकेनं केलं आहे.
- अशी आहेत झिकाची लक्षणं : ताप येणं, अंगावर पुरळ येणं, डोळे येणं, सांधे आणि स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी आदी झिका आजाराची लक्षणं आहेत. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा, असं आवाहनही कोल्हापूर महापालिकेनं केलं आहे.
या परिसरात देण्यात आले गप्पी मासे : शहरातील 8 क्रमांकाच्या शाळेसमोर, कदम खण जुना वाशी नाका, रंकाळा तलाव परिसर, क्रशर खण चौक, मंगेशकरनगर खण, टाऊन हॉल गार्डन, रंकाळा स्टँड परिसर, दुधाळी परिसर, ताराबाई पार्क, रमणमळा, महावीर गार्डन परिसर, न्यू शाहूपुरी, कोटीतीर्थ तलाव परिसर, रुईकर कॉलनी, टेंबलाईवाडी याठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्रातून मोफत गप्पी मासे महापालिकेच्या वतीनं दिले जातात. नागरिकांनी इथून गप्पी मासे घेऊन जावे, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.
गरोदर मातांना आहे अधिक धोका : झिका व्हायरसमुळे गर्भात असलेल्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे गर्भाची वाढ खुंटू शकते. यामुळं गरोदर मातांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे. डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणं नष्ट करावीत, एडीस डासांमुळे झिका व्हायरस पसरतो. हा डास दुपारी अधिक सक्रिय असल्यानं गरोदर मातांसह नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी केलं आहे.
हेही वाचा :