कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. सर्व नदी-नाल्यांना पूर आल्याने ओढे-नाले ओसंडून वाहत आहेत. मात्र, या पुराच्या पाण्यात काही तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी सुरू आहे. राजाराम बंधारा परिसरात तरुणाने केलेली स्टंटबाजी अंगावर शहारे आणणारी आहे. तर चंदगड तालुक्यात कडलगे आणि ढोलगरवाडीमध्ये ओढ्याच्या पाण्यात दुचाकी घालण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. त्यात या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापन, एनडीआरएफ पथक तैनात
कोल्हापूर शहरात सध्या पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. तसेच, जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावत परिसराला झोडपून काढले आहे. गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीकडे जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, एनडीआरएफ पथक तैनात करण्यात आले आहे. मात्र, अनेक तरुण या परिस्थितीत आपल्या जीवाची परवा न करता स्टंटबाजी करत आहेत.
विद्युत खांबावरून पुरात उड्या
गुरूवारी (22 जुलै) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली. दरम्यान, राजाराम बंधारा परिसरात जवळपास पाच ते सहा तरुणांनी पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या. तर एकाने पुराच्या पाण्यात बुडालेल्या विद्युत खांबावर चढत थेट खांबावरून पुराच्या पाण्यात उडी घेतली. या तरुणांच्या स्टंटबाजीमुळे उपस्थित नागरिकांचा थरकाप उडाला.
चंदगडमध्ये एकाचा मृत्यू
दुसरीकडे, गुरूवारी सायंकाळी चंदगड तालुक्यातील कडलगे आणि ढोलगरवाडी दरम्यान असलेल्या एका ओढ्यावर पाणी आले होते. या पाण्यातून दुचाकी घालणे दोघा तरुणांना महागात पडले. पाण्याच्या प्रवाहाने दुचाकीसह दोघेही तरुण वाहून जात होते. यावेळी स्थानिकांनी एकाला वाचविण्यात यश मिळवले. मात्र, अभिषेक पाटील या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.
स्टंटबाजांवर होणार कारवाई
'पुराच्या पाण्यात पोहणे, वाहन चालवणे या गोष्टी नागरिकांनी टाळाव्यात. तसेच नागरिकांनी असे कोणतेही धाडस करू नये. पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिल्या आहेत', असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - #PuneRain : लोणावळ्यात ढगफुटी! घरे-बंगले जलमय, 24 तासात 400 मिमी पाऊस