कोल्हापूर - मैत्रिण बोलत नसल्याच्या नैराश्यातून बारावीच्या विद्यार्थ्याने कोल्हापुरात आत्महत्या केली. शिक्षणासाठी शहरात राहत असलेल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. श्रीराम संजय कोळी (वय १७. रा. गोंदवले, ता. माण, जि. सातारा) असे मृत युवकाचे नाव आहे.
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम हा चाटे स्कूलमध्ये बारावीत शिकत होता. तो राजारामपुरी येथे बहिणीसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. श्रीरामची बारावीची परीक्षा सुरू होती. पेपरवरून आल्यानंतर बहिणीने त्याला फोन करून विचारपुस केली. त्यावर श्रीरामने पेपर चांगला गेला, असे सांगून फोन ठेवला. सायंकाळी पाचच्या सुमारास ती घरी आली असता घराचा दरवाजा आतून बंद होता. तिने आवाज दिला असता आतून प्रतिसाद आला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता श्रीरामने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले.
पोलिसांना श्रीरामच्या बॅगमध्ये एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये मैत्रिणीवर माझे खूप प्रेम आहे. काही दिवसापासून ती माझ्याशी बोलत नाही. तिला समजवण्याचा प्रयत्न केला असता ती मला टाळत होती. ती बोलत नाही म्हणुन माझे जीवन संपवून टाकत आहे. त्यास कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले आहे. संबंधित मैत्रिणीकडे चौकशी केली असता. तिने श्रीरामला परीक्षा झाल्यानंतर आपण बोलू असे सांगितले होते. तो बोलण्यासाठी आणि भेटण्यासाठी हट्ट करत होता. परीक्षा सुरू असल्याने त्याला भेटत नव्हते, असे तिने सांगितले.