कोल्हापूर - मी इंग्रजीत नापास होणारच, ४ दिवसांपासून प्रणव घरी हेच सांगत होता. मित्रांना आणि आजूबाजूच्यांना निकाल काय सांगणार? हा एकच प्रश्न प्रणवच्या डोक्यात निकालाची तारीख जवळ येत असताना त्याला पडत होता. निकालची तारीख जाहीर झाली आणि प्रणवने भीतीपोटी आपले जीवन संपवले. मात्र, आज निकाल जाहीर झाला, आणि ज्याची भीती होती त्या विषयात तो पास झाला होता.
कोल्हापूरच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार विद्यालयातील प्रणव सुनील जरग याची दहावीच्या निकालाची माहिती मिळताच सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. नापास होणार असल्याचे सांगितल्यानंतरही घरचे त्याला धीर देत होते. नापास झालास तरी चालेल काही हरकत नाही. पुन्हा प्रयत्न कर, असे वडील सुनील जरग यांनी वारंवार प्रणवला सांगितले. मात्र, प्रणव मनातून पुर्णपणे खचला होता. मित्रांना आणि आजूबाजूच्यांना निकाल विचारल्यावर काय सांगायचे हाच विचार त्याला सतावत होता. त्यामुळेच त्याने गुरुवारी सायंकाळी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आपले जीवन संपवले. शनिवारी मित्रपरिवाराने प्रणव पास झाल्याचे नातेवाईकांना कळवले, पण ज्या भीतीपोटी प्रणवने आपले जीवन संपवले होते तोच प्रणव याचा आनंद साजरा करायला या जगात नाही.