कोल्हापूर - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सालाबादप्रमाणे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवीची सालांकृत पूजा बांधण्यात आली. ही पुजा बांधल्यानंतर देवीची उत्सव मूर्ती गरुड मंडपात फुलांनी सजवलेल्या पाळण्यात ठेवत धार्मिक विधी पार पडले. मात्र, लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी भाविकांशिवायच ही पूजा पार पडली.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अंबाबाई मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येत असतात. भाविकांच्या उपस्थितीत दरवर्षी देवीची सालांकृत पूजा आणि आरती होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हे विधी पार पडले.
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केला गेला असला, तरी पुजाऱ्यांच्या उपस्थितीत मंदिरात सर्व धार्मिक विधी नियमित पार पडतात. अशात आता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भाविकांना मंदिरात येणे शक्य नव्हते. मात्र, तरीही त्याच उत्साहात आणि परंपरेने देवीची पूजा करण्यात आली.