कोल्हापूर - चारित्र्याच्या संशयावरून पती, सासू व दीर यांनी मिळून विवाहितेचे मुंडन केल्याची संतापजनक घटना कोल्हापूरात जिल्ह्यात घडली आहे. शिरोळ तालुक्यातील तेरवाडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी महिलेचा पती, सासू आणि दीर या तिघांच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सासरच्या व्यक्तींनी वारंवार चारित्र्याच्या संशयावरून छळ केल्याची फिर्याद महिलेने दिली आहे. बुधवारी सांयकाळी ही घटना घडल्याची माहिती आहे. 'तुझं वागणं चांगलं नाहीये. तुझे कोणासोबत तरी विवाहबाह्य संबंध आहेत', असे म्हणत मारहाण केल्याचे महिलेने तक्रारीत सांगितले आहे. सासू, दिराने तिला पकडून ठेवले तर पतीने घरातील दाढी करायच्या वस्तऱ्याने आणि कात्रीने तिचे मुंडन केले.
या प्रकारानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून संबंधित घटनेची चौकशी करून सासरच्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. आज त्या तिघांना न्यायालयात हजर केले जाणार असून त्यांना पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे.