कोल्हापूर - पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने कोल्हापूरचा महापूर ओसरायला सुरुवात झाली आहे. गुरुवारपासून जवळपास दोन ते अडीच फूट पाण्याची पातळी कमी झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी ५२.११ फूट असून आलमट्टी धरणातूनसुद्धा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. परंतु, अध्यापही १० ऑगस्टपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा काही तासात पूरस्थिती जैसे थे होण्याची शक्यता आहे.
मागील १५ दिवसांपासून कोल्हापूरमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. कोल्हापूरकरांनी आजपर्यंत अशा प्रकारचा भयंकर महापूर कधी पाहिला नाही. कोल्हापूरमध्ये १९८९ आणि २००५ यावर्षी सर्वाधिक मोठा महापूर आल्याच्या नोंद आहे. परंतु, ही नोंद मोडत २०१९ मध्ये आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या महापुराची नोंद झाली आहे. यापूर्वी पंचगंगा नदीची पाणी पातळी कधीही ५० फूट ओलांडली नाही. परंतु, यावर्षी ही पाणी पातळी चक्क ५६ फुटांवर जाऊन पोहोचली होती.
या महापुराचा फटका शहरासह जिल्ह्यातील २२३ गावांना बसला आहे. जिल्ह्यात १८ गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. दीड लाख लोकांना स्थलांतरित करावे लागले. अशा या महाप्रलयाचा कोल्हापूरकारांना सामना करावा लागला. पण सध्या कोल्हापुरात पूर ओसरत आहे. गुरुवारपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी अडीच फुटांनी कमी झाली आहे. शिवाय आलमट्टी धरणातूनसुद्धा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच कोल्हापूरातील पूरस्थिती नियंत्रणात येईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. शिवाय एनएच ४ वरील वाहतूकसुद्धा लवकरच सुरू होईल, अशी परिस्थिती आहे.