कोल्हापूर - पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी अजूनही 51 फुटांवर आहे. काल (शनिवारी) दिवसभरात पाण्याची पातळी केवळ 1 फुटांनी कमी झाली आहे. शिवाय अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग दिवसभर सुरू असतानाही पाणी पातळी कमी झाली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील पाण्याची पातळी दीड फूट असल्याने महामार्ग सुरुल होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
पंचगंगा नदीची पाणी पातळी 51 फुटांवर आहे. मात्र, धोका पातळी 43 फूट इतकी आहे. त्यामुळे अजूनही कोल्हापूर धोका पातळीच्या खाली यायला पाण्याची पातळी अजून 9 फुटांनी कमी होणे गरजेचे आहे. पावसाचा जोर काल पासून थोडा कमी झाला आहे. राधानगरी, गगनबावडा आणि आजरा या भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे बंद झालेले राधानागरीचे स्वयंचलित सात दरवाजांपैकी दोन दरवाजे सुरु असल्याने या दरवाजांमधून प्रतिसेकंद 4200 क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी अद्याप 51 फुटांवर आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पूर ओसरत असला तरी अजूनही गंभीर परिस्थिती आहे.