कोल्हापूर - भुदरगड तालुक्यातील मौजे वासनोली पैकी जोगेवाडीवरील धनगरवाडा स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे रस्त्याविना वनवास भोगत असल्याचे चित्र आहे. अनेक वेळा आजारी रुग्णाला डोंगरातून वाट काढतच मुख्य रस्त्यापर्यंत चालत यावे लागते. पावसाळ्यात तर खूपच बिकट परिस्थिती बनते. नुकत्याच एका गरोदर महिलेलाही धनगरवाड्यावरील नागरिकांनी बांबूची डोली करून उपचारासाठी घेऊन यावे लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इथले लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून नेमकं काय करतायेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- वासनोली पैकी जोगेवाडीवरील धनगरवाड्याला रस्त्याची मागणी :
भुदरगड तालुक्यातील वासनोली येथे जवळपास 200 लोकवस्तीचा धनगरवाडा आहे. या धनगरवाड्यावर जाताना जोगेवाडीतून दोन किलोमीटर चढून जावे लागते. उन्हाळ्यात धनगरवाड्यावर पायी ये-जा करता येते. मात्र, पावसाळ्यात खूपच बिकट परिस्थिती निर्माण होत असते. अनेकवेळा आपत्कालीन स्थितीत रुग्णांना तत्काळ हलवण्याची वेळ आल्यास त्यांना खांद्यावर उचलून घेऊन दोन किलोमीटर चालत नेण्यापासून पर्याय नसतो.
- बांबूच्या डोलीतून 2 किलोमीटर चालत आणले -
शुक्रवारीसुद्धा असाच एक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. धनगरवाड्यावरील एक गरोदर महिला संगीता शिवाजी फटकारे (वय२३) यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्याची वेळ आली होती. मात्र, मुसळधार पावसात धनगरवाड्यावरून खाली उतरून त्यांना कसे खाली आणायचे हा प्रश्न तिथल्या नागरिकांना पडला. शेवटी धनगरवाड्यावरील नागरिकांनीच बांबूच्या डोलीतून तब्बल 2 किलोमीटर चालत खाली जोगेवाडीत रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन यावे लागले.
कशा पद्धतीने इथल्या नागरिकांना भौतिक सुविधांसाठी अजूनही त्रास सहन करावा लागत आहे याचे दृश्यांमधून समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी नेमकं काय करतात? इतक्या वर्षात इथल्या नागरिकांना का सुविधा पोहोचवू शकले नाहीत? आणि इच्छा होतीच तर आतापर्यंत काय केले? याबाबत उत्तर द्यावीच असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.