कोल्हापूर- इंधनापाठोपाठ आता भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. इंधनदरवाढीचे कारण पुढे करत भाज्यांचे दर किलोमागे किमान २० ते ३० रुपयांनी वाढवले आहेत. त्याचा परिणाम गृहिणीच्या घरखर्चावर होत असून त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
इंधन दरवाढीचा परिणाम
कर्नाटकसह , सांगली, साताऱ्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तम प्रतीचा भाजीपाला कोल्हापूर बाजारपेठेत येत असतो. त्यामुळे घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक वाढली असली तरी महत्त्वाच्या भाज्यांचे दर अजूनही स्थिर आहेत. मात्र, इंधन वाढीचे कारण देत किरकोळ विक्रेत्यांनी ग्राहकांचे खिसे कापायला सुरुवात केली आहे. उपवासासाठी आवश्यक असलेल्या मका, फ्लॉवर, गवार, शेंगदाणा, वाटाणा, सुरण, ढब्बू, या भाज्यांची दरवाढ झाली आहे.
वाटाणा, गवार महागले
मागील महिन्यात घाऊक बाजारात ४५ रुपये किलोने मिळणारा वाटाणा सध्या ७० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. किरकोळ बाजारात काही ठिकाणी तो १०० रुपये किलोनेही विकला जात आहेत. सांगली, सातारा आणि बेळगाव तसेच आसपासच्या परिसरात प्रामुख्याने कोल्हापूर तसेच जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक कोल्हापूर कृषी बाजार उत्पन्न समितीत होते. गेल्या आठवड्यात फळभाज्यांची चांगली आवक झाली आहे. तरीही घाऊक बाजारात काही भाज्यांचे दर किलोमागे दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. वाटाणा आणि गवार या भाज्यांचे दर किलोमागे २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत. मात्र, या अल्प दरवाढीला इंधन दरवाढीचे कारण देत किरकोळ विक्रेत्यांनी अव्वाच्या सव्वा दराने भाजी विक्री सुरू केल्याचे चित्र अनेक बाजारांमध्ये दिसत आहे. फळांची मागणी वाढल्याने घाऊक बाजारात त्यांची दरवाढ झाली आहे. त्यातही सफरचंद, मोसंबी आणि डाळींबच्या किंमतीत वाढ झाली आहे.