कोल्हापूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबांसह अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत तसेच शिवसेनेचे विजयी खासदार उपस्थित आहेत.
ढगाळ वातावरणामुळे त्यांच्या विमान लँडींगला अडथळा येत होता. त्यामुळे कोल्हापुरात येणारी एअर इंडियाची विमाने परत पाठवली होती. त्यामुळे त्यांना पोहोचण्यासाठी वेळ लागणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, अखेर त्यांचे विमान लँड झाले असून ते कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यावेळी कोल्हापूर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते सयाजी हॉटेलमध्ये विश्रांती घेणार होते. मात्र, विमान उशिरा पोहोचल्याने ते थेट अंबाबाईच्या मंदिरात गेले. त्याठिकाणी चंद्रकांत दादा पाटील दाखल झाल्यानंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
युतीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अंबाबाईच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन अंबाबाईला येईल, असा नवस उद्धव ठाकरे बोलले होते. तोच नवस फेडण्यासाठी आज उद्धव ठाकरे सहकुटुंब अंबाबाईच्या दर्शनाला आले आहेत.
विशेष म्हणजे कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे २ खासदार निवडून आले आहेत. कोल्हापूर मतदारसंघातून संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांचा पराभव करत विजय मिळवला. तसेच हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी यांचा पराभव करत धैर्यशील माने यांनी विजय मिळवला. त्यामुळे खणा-नारळाने अंबाबाईची ओठी सुद्धा भरली आहे. अंबाबाईच्या दर्शनानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत.
लोकसभेच्या यशापेक्षाही मोठा पराक्रम विधानसभेत दाखवणार - अरविंद सावंत
उद्धव ठाकरे यांनी अंबाबाईच्या चरणी साकडे घातले होते. ते आता पूर्ण झाले आहे. मात्र, आता लोकसभेत मिळालेल्या यशापेक्षाही मोठा पराक्रम विधानसभेत दाखवणार असल्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत म्हणाले. सावंत अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यावेळी ते बोलत होते.
निवडून आलेल्या १८ खासदारांपैकी खासकरून कोल्हापुरातील २ खासदार निवडून आले आहेत. त्याचा विशेष आनंद होत आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना किती आनंद झाला असता? हे शब्दात सांगण्यासारखे नाही, असे सावंत म्हणाले.