कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची बुधवारी 2 डिसेंबरला वर्षा बंगल्यावर बैठक पार पडणार आहे. या बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती सुद्धा हजर राहणार आहेत. यामध्ये मराठा समाजाचे समन्वयक तसेच अभ्यासक सुद्धा उपस्थित राहतील. सध्या सुरू असणाऱ्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने ही बैठक होणार असल्याने संपूर्ण मराठा समाजाचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.
संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली होती बैठकीसाठी वेळ -
11 वी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपर न्युमेररी पद्धतीने एसईबीसीत मराठा विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीने समावेश करण्यात येईल, यावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती. मराठा समाजाची आक्रमकता पाहून उद्धव ठाकरे यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. बुधवारी 2 डिसेंबरला दुपारी 4 वाजता ही बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडणार असून यामध्ये अशोक चव्हाण यांच्यासह सकल मराठा समाजाचे समन्वयक सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
8 डिसेंबरला मोर्चा निघणारच -
मराठा आरक्षण वगळून भरती प्रक्रिया राबवू नये, या मागणीसाठी येत्या 8 डिसेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. काल पुण्यात आयोजित बैठकीमध्ये हा निर्णय झाला असून कोल्हापुरातून सुद्धा मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव सहभागी होणार आहेत. दरम्यान, या मुख्यमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा - नागपुरात कार चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर नेले फरफटत; घटना सीसीटीव्हीत कैद