कोल्हापूर: दोन दिवसांपासून शिवसेनेच्या काहिजनांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा शिस्तभंगाच्या कारवाईबाबत वक्तव्य केले होते. आता उदय सामंत यांनी सुद्धा याबद्दल वक्तव्य केल्याने आता नेमकी कोणावर कारवाई होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. ते कोल्हापूरातील विमानतळ येथे माध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊतांकडे मनोरंजन म्हणून पाहतो : उद्योगमंत्री उदय सामंत यांना संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता संजय राऊत यांच्याकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो असा टोला लगावला. यावेळी शिवसेनेबद्दल बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील आणि तो शिवसेनेच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला बंधनकारक असेल. महाविकास आघाडी मधील शिवसेना आणि आताची शिवसेना यामध्ये निवडणूक आयोगानेच बदल केले आहेत. शिवसेना म्हणजे आता एकच शिवसेना आहे. आमची युती भाजपसोबत आहे असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
शिंदेंकडे येण्यासाठी ओघ वाढला : शिवसेना नेमकी कोणाची याबद्दल लढाई सुरू होती. त्याचे उत्तर मिळाले असून शिवसेना म्हणजे आता एकच शिवसेना आहे. त्यामुळे या शिवसेनेकडे येण्यासाठी मोठ मोठ्या नेत्यांचा ओघ वाढला असल्याचे सुद्धा उदय सामंत यांनी म्हंटले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला उदय सामंत यांनी आपल्या शैलीत टोला लगावला. ते म्हणाले, आपण त्यात नाही हे दाखवण्यासाठी आणि सरकारला बदनाम करण्यासाठी अशी आंदोलनही करावी लागत आहेत. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मुंबईत एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. नुकसान होणार नाही असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून बदनामीचे राजकारण - उदय सामंत