कोल्हापूर - कोल्हापुरातील मसाई पठारावर पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळल्याने दोन जण ठार झाले आहेत, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेली ती कार पठाराच्या कड्यावरून सहाशे फूट खोली दरीत कोसळली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अमित सुरेश गुप्ता (वय 30) आणि मयत पुष्पक निगडे (वय 30) अशी मृतांची नावे असून निखिल युवराज शिंगे (रा. कबनूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या अपघातामध्ये पुष्पम निगडे हे जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले होते. जखमी आणि मृत पर्यटकांना वेखंडवाडी येथील ग्रामस्थांनी स्ट्रेचरच्या सहाय्याने दाट झाडी झुडपातून बाहेर काढून मुख्य रस्त्यावर आणले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना तात्काळ कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यातील अमित सुरेश गुप्ता याचाही मृत्यू झाला. दरम्यान, जखमी निखिल युवराज शिंगे याच्यावर सद्या उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले, रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.
गाडीचा मोठा आवाज आल्याने दुर्घटना झाल्याचे समजले -
ज्या परिसरात हा अपघात घडला तो परिसर अगदीच निर्मनुष्य आहे. चारचाकी कोसळून मोठा आवाज झाल्याने वेखंडवाडी गावातील ग्रामस्थांना ही घटना लक्षात आली. त्यामुळे गावातील काही नागरिक तात्काळ नागरिक घटनास्थळी गेले. त्यातील दोघा जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतुन उपचारासाठी पाठवले. दुर्दैवाने यातील एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, एकावर उपचार सुरू आहेत. जर इथल्या नागरिकांना मोठा आवाज आला नसता तर दुसऱ्या दिवशीपर्यंत अपघात घडल्याचे कोणालाच समजले नसते अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.
