कोल्हापूर - जिल्ह्यात फेज चारच्या नियमानुसार निर्बंध कायम केल्याने व्यापारी वर्ग आक्रमक झाला होता. कोणत्याही परिस्थितीत दुकाने उघडण्याचा इशारा दिल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांच्यासोबत आज (सोमवारी) व्यापारी संघटनेची बैठक झाली. या बैठकीत व्यापारी संघटनांनी जिल्हा प्रशासनाला तूर्तास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र दोन दिवसात निर्णय न झाल्यास जिल्ह्यातील सर्व दुकाने उघडण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला आहे.
'शहर मर्यादित व्यवसायाला परवानगी द्या'
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आस्थापने उघडण्याचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने व्यापारी संघटनेबरोबर बैठक घेण्याची सूचना दिली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांच्यासोबत व्यापारी संघटनांची बैठक पार पडली. गेल्या तीन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी संघटनेने केली. मात्र कोल्हापुरात कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिकच वाढत असल्याने निर्बंध कायम ठेवले आहेत. या बैठकीत व्यापारी संघटनेने कोल्हापूर आणि इचलकरंजी शहराचा आरटीपीसीआर पॉझिटिव्हिटी दर निश्चित करावा. जिल्ह्यापासून या दोन शहरांचा स्वतंत्र अहवाल राज्य सरकारला पाठवून शहर मर्यादित व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
'...तर दुकाने सुरू करू'
कोरोनाचे संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण व टेस्टिंग वाढवावी. हे पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने लसीकरण मोहीम अधिक गतिमान करावी, अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली आहे. टेस्टिंगची संख्या वाढवून पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्याची मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा कोल्हापूर शहरातील आरटीपीसीआर पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्के पेक्षा कमी आहे. राज्य सरकारच्या निकषानुसार कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरापुरते व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळावी, यासाठी राज्य सरकारकडे लवकरच पाठपुरावा करू, शिवाय याबाबतचा अहवाल लवकरच पाठवून योग्य कार्यवाही केली जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिली आहे. तर येत्या दोन दिवसात निर्णय न झाल्यास प्रशासनाच्या कोणत्याही दबावाला न जुमानता दुकाने सुरू करणार असल्याचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
हेही वाचा -फडणवीसांनी असा त्रागा करुन घेऊ नये, संन्यास घेतील त्यांचे दुष्मन! शिवसेनेने लगावला टोला