कोल्हापूर : कोल्हापुरातील ऐक्य दाखविण्यासाठी आणि पुरोगामी विचार जपण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत शिव-शाहू सद्भावना फेरी काढण्याचा निर्धार राजर्षी शाहू सलोखा मंचकडून करण्यात आला आहे. आज होणाऱ्या शिव-शाहू सद्भावना फेरी व सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी अठरापगड जाती समाजातील घटकांच्या गाठी-भेटी घेतल्या जात आहेत. ही फेरी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारकाला अभिवादन करून सुरवात होणार आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. याकरिता राजर्षी शाहू सलोखा मंचचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह त्यांचे सहकारी सर्वांच भेटी घेत आहेत. मुळीक यांनी 80 हून अधिक जाती समाजांचे संघटन केले आहे. त्याचबरोबर राजर्षी शाहू मंचकडून तयार केलेल्या आचारसंहितेची माहिती सर्व घटकांपर्यंत पोहोचवली जात आहे.
हिंदू-मुस्लिम समाजातील एकोपा कायम ठेवण्यासाठी अधिकाधिक संख्येने बांधवांनी या फेरीत सहभागी व्हावे.- राजर्षी शाहू सलोखा मंचचे अध्यक्ष वसंतराव मुळीक
कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही : या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासोबत राजर्षी शाहू सलोखा मंचच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूरची शाहू विचारांची परंपरा नमूद करताना शिवराज्यभिषेक दिनी घडलेली दंगल दुर्दैवी असल्याचे म्हणत या फेरीत काही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी फेरी काढण्यात येऊ नये अशी भूमिका मांडली. मात्र वसंतराव मुळीक यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत फेरी निघणार असल्याने त्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी माजी महापौर आर. के. पोवार, वसंतराव मुळीक, राजू लाटकर, दिलीप पवार, इंद्रजित सावंत, बबनराव रानगे, सतीश कांबळे, उदय नारकर, डी. जे. भास्कर, गिरीश फोंडे, सरलाताई पाटील, भारती पोवार, शैलजा भोसले, अजित सासने, रवी जाधव, विजय पाटील, संदीप देसाई उपस्थित होते.
हिंदुत्ववादी संघटनाचा रॅलीला विरोध : औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला काहीही न करता, त्याच्या परिणामस्वरूप हिंदूंनी दिलेल्या प्रत्युत्तराविषयी सद्भावना रॅली का काढली जात आहे? फक्त हिंदूंवर अन्याय झाल्यानंतर हिंदू रस्त्यावर उतरल्यावरच कसे सुचते? वास्तविक सद्भावना रॅलीच्या नावाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा डाव असल्याचे निवेदन सकल हिंदू समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, काश्मीर, पश्चिम बंगाल, केरळमध्ये असंख्य हिंदूंच्या राजरोसपणे हत्या झाल्या, तेव्हा 'सद्भावना रॅली' हा प्रकार का कुणी काढला नाही? तसेच राज्यात लव्ह जिहाद, धर्मांतर इत्यादी होतच आहे. जळगाव, नगर, अकोला अशा कित्येक जिल्ह्यांत धर्मांधांनी पोलिसांच्या गाड्या पेटवून दिल्या. सद्भावना रॅली काढू इच्छिणारे त्यावेळी कुठे होते? कोल्हापूर येथील ७ जूनचा हिंदूंचा उद्रेक हा उगाचच झालेला नव्हता. त्यामागे अनेक कारणे होती.
हेही वाचा :