कोल्हापूर - तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन सुरू झाला असून बाहेर अडकलेल्या नागरिकांना परत आणण्याची सशर्त परवानगी गृहमंत्रालयाने दिली आहे. त्यानंतर प्रशासनाने नाव नोंदणीसाठी एक लिंक प्रसिद्ध केली होती. या लिंकला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. एकाच दिवसात तब्बल 21 हजार 118 नागरिकांनी शासनाने दिलेल्या लिंकवर जाऊन आपली ऑनलाईन नावनोंदणी केली आहे.
यामध्ये कोल्हापूर शहरात येण्यासाठी 12 हजार 148 जणांनी तर जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी 8 हजार 940 जणांनी नोंदणी केली. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी आणि इतर काही नागरिक अडकले आहेत. अशा व्यक्तींना आपापल्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यामध्ये जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधून बाहेर जाणाऱ्या तसेच बाहेरच्या जिल्ह्यामधून कोल्हापूरात येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लिंक तयार केली आहे. यावर माहिती भरण्याचे आवाहन काल केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
नाव नोंदणीसाठी लिंक - https://bit.ly/Kopentryexit
जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी अधिक माहितीसाठी 9356716563, 9356732728, 9356713330, 9356750039 आणि 9356716300 हे पाच व्हाट्सअॅप क्रमांक दिले आहेत. यावरही नागरिकांना लिंक मिळेल. त्याच प्रमाणे जिल्हा प्रशासनाच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर आणि 0231-2659232, 2652950, 2652953-54 या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.