कोल्हापूर - एकूण पदाच्या 4 टक्के जागा रिक्त असाव्यात, असा नियम आहे. मात्र, शाहूवाडी तालुक्यात तब्बल 30 टक्के शिक्षकांच्या जागा अद्याप रिक्त ( Teacher vacancies In Shahuwadi ) आहेत. शिवाय काही शाळांमध्ये तर 4 वर्षांपासून शिक्षकच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत केवळ शाहूवाडी तालुक्यातच इतक्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त का? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच, याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
शाहूवाडी तालुक्यातील सद्यस्थितीवर एक नजर
शाहूवाडी तालुका हा विशेषतः दुर्गम भागातच येतो. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात एकूण जवळपास 268 प्राथमिक शाळा असून, त्यामध्ये एकूण जवळपास 900 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी 714 शिक्षक सध्या कार्यरत असून, अजूनही 186 पदे रिक्त आहेत. म्हणजेच एकूण जवळपास 30 टक्के जागा अद्यापही रिक्त आहेत. जिल्ह्यातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे. मात्र, दुसरीकडे इतर तालुक्यांत केवळ 2 ते 4 टक्के इतकीच पदे रिक्त आहेत. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यावर मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. 30 टक्के पदे अद्याप रिक्त असल्याने पुढची पिढीच प्रशासनाने अंधारात ठेवली असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
4 वर्षांपासून एकही शिक्षक कार्यरत नाही
- न्हाव्याची वाडी (8 विद्यार्थी)
- मांजरे जवळची गवळेवाडी (7 विद्यार्थी)
- धुमकवाडी (10 विद्यार्थी)
मोठा पट मात्र शिक्षक 2 ते 3
- सावर्डी - शाळेचा पट 70, शिक्षक 2
- गेळवडे - शाळेचा पट 50 पट, शिक्षक 2
- विशाळगड - शाळेचा पट 70, शिक्षक 1
- करांजफेन - शाळेचा पट 220, शिक्षक 4, असायला हवे 9
- बुरंबाळ - शाळेचा पट 95, शिक्षक 2, असायला हवेत 5
- अनुस्कुरा - शाळेचा पट 85, शिक्षक 2, असायला हवे 4
- मांजरे - शाळेचा पट 87, शिक्षक 2
- कुंभवडे - शाळेचा पट 84, शिक्षक 2
शाहूवाडीमधील 166 शाळा दुर्गम घोषित करण्याची मागणी
दरम्यान, शाहूवाडी तालुक्यातील एकूण 268 शाळांपैकी 166 शाळा राज्य शासनाच्या निकषानुसार दुर्गम असल्याचे म्हणत त्याला दुर्गम शाळांच्या यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, अनेक शाळा निकषात बसत नसल्याचे कारण देत केवळ 77 शाळांना दुर्गमच्या यादीत समाविष्ट करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
दुर्गम शाळांसाठी काय आहेत निकष?
दुर्गम शाळांबाबत राज्य शासनाने एकूण 7 निकष घातले आहेत. त्यापैकी 3 निकषांत संबंधित शाळा बसत असेल तर ती शाळा दुर्गम मध्ये समाविष्ट करता येते. यामध्ये प्रामुख्याने फेसा कायदा, 2000 मिलिमीटर पाऊस होणार भाग, महसूल विभागाने डोंगरी म्हणून जाहीर केलेला विभाग, हिंस्र प्राण्यांचा वावर, वाहतूक सुविधांचा अभाव, संवाद छाया - बीएसएनएलची रेंज नाही, असा भाग आणि जंगल व्याप्त प्रदेश, असे निकष लावण्यात आले आहेत.
मात्र, आता त्यात फेरबदल करण्यात आले. यामध्ये हिंस्र प्राण्यांचा वावर याबरोबरच हिंस्र प्राण्याने हल्ला केलेली नोंद असायला हवी. शालेय पोषण आहाराची गाडी ज्या शाळेवर जाते ती शाळा, संवाद छाया मध्ये सुद्धा बदल करून बीएसएनएल सोडून इतर कुठल्याही कंपनीची रेंज असेल तरीही संबंधित गावातील शाळा दुर्गम मधून वगळण्यात आली आहे. या बदल केलेल्या निकषामुळे शाहूवाडी तालुक्यातील 166 शाळांपैकी केवळ 77 शाळा दुर्गम मध्ये येत आहेत. परिणामी उरलेल्या शाळांमध्ये शिक्षण जाण्यास इच्छुक दिसत नाहीत.
अनेक शिक्षकांचा शाहुवाडीमध्ये जाण्यास विरोध
काही अपवाद वगळता दुर्गम भागात जाण्यास अनेक शिक्षक नकार देतात. काहींनी तर आपल्या सोयीनुसार बदल्या करून घेतल्या आहेत. मात्र, काही जण दुर्गम ठिकाणी नोकरी करून 3 वर्षानंतर आपल्याला हवी तिथे बदली मिळत असल्याने दुर्गम शाळेत तात्काळ जायला तयार होतात. भौगोलिक दृष्ट्या अनेक शाळा दुर्गम असून, सुद्धा त्यांना दुर्गम यादीत समाविष्ट न केल्याने त्या शाळांमध्ये जायला शिक्षक नकार देतात. तर काहीजण ओळखीचे वापर करून पाहिजे त्या ठिकाणी बदली करुन घेतात.
आमदार विनय कोरे यांनी अधिवेशनात मांडला मुद्दा
शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा तसेच दुर्गम शाळांचा प्रश्न अधिवेशनात मांडला. शिवाय प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यात सर्वाधिक रिक्त जागा शाहूवाडी तालुक्यात आहेत. या भागाकडे दुर्लक्ष होत असून, याकडे लक्ष देण्याची मागणी सुद्धा कोरे यांनी केली आहे. शिवाय अनेक निकष लावून दुर्गम साठी पात्र शाळा सुद्धा त्यामध्ये वगळण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
हेही वाचा - Holika Dahan 2022 : पर्यावरण रक्षणासाठी होळी दहनात लाकडाला 'गो कास्ट'चा पर्याय