कोल्हापूर - उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अंगरक्षकाची पिस्तूल चोरी झाल्याची घटना घडली आहे. क्षीरसागर यांच्या राहत्या घरी चोरी झाली असून चोरट्याने पिस्तूलसह ३० जिवंत काडतुसे, सोने आणि रोकड लंपास केली आहे. गुरूवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला असून यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार राजेश क्षीरसागर यांचे अंगरक्षक पोलीस हवालदार अनिकेत मोरे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. बाहेर जातेवेळी त्यांनी आपल्याकडील पिस्तुल तिजोरीमध्ये ठेवले होते. त्यांची पत्नीसुद्धा सांगली येथे आपल्या नातेवाईकांकडे गेली होती. मोरे यांची पत्नी सांगलीहून घरी आली तेव्हा त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तत्काळ हा प्रकार मोरे यांना सांगितला.
घटनेची माहिती मिळताच मोरे शुक्रवारी पहाटे घरी आले आणि याबाबत पोलिसांत माहिती दिली. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांत याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसाच्याच घरी चोरट्याने डल्ला मारून पिस्तूल पळवल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. मागील दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. यादव नगरच्या एका मटका अड्ड्यावर छापा टाकला असता त्यावेळीसुद्धा एकाने पोलिसांचे पिस्तूल पळवले होते. ते काही दिवसांनी पोलिसांना मिळाले. मात्र, आता पुन्हा एकदा पोलिसाच्या घरातच चोरी करून पिस्तूल पळविण्यात आले आहे.