कोल्हापूर - बीए, बीकॉम, बीएस्सी सह पाच अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठने हा निर्णय घेतला आहे. विषयाच्या सांकेतिक क्रमांकातील फरकाची तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे विद्यापीठाने हा निर्णय घेतला. आज(22 मार्च)पासून या परीक्षा होणार होत्या. मात्र, एक दिवस अगोदर परीक्षा रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले. या सत्रातील बीकॉम, आयटी, बँक मॅनेजमेंट आदी 25 विषयांच्या परीक्षा मात्र आज पासूनच होणार आहेत.
तांत्रिक अडचणींचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये म्हणून निर्णय -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियुक्त केलेल्या नियोजन समितीने केलेल्या शिफारशीनुसार 22 मार्चपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने हिवाळी सत्रातील परीक्षा घेण्याचे ठरवले होते. याचे वेळापत्रक शिवाजी विद्यापीठाने एक महिना अगोदर जाहीर केले होते. त्यानुसार ऑनलाइन, ऑफलाइन, पर्याय देणे, मॉक टेस्ट देणे आदी प्रक्रिया सुरू झाल्या होत्या. मात्र, जुन्या अभ्यासक्रमातील आणि बदललेल्या अभ्यासक्रमातील 'सब्जेक्ट कोड'मध्ये फरक असल्याची तांत्रिक अडचण परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या निदर्शनास आली. या अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र आणि त्यासंदर्भातील एसएमएस मिळाले नाहीत. अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत विद्यापीठाकडे तक्रारही केली आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने ठराविक विषयांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना याचा फटका बसू नये यासाठीच हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रद्द केलेल्या पेपरची तारीख लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
45 हजार विद्यार्थी देणार होते परीक्षा -
बीए, बीकॉम, बीएस्सी सह पाच अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासाठी तब्बल 45 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील अनेकांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी विद्यापीठाकडे याबाबत तक्रारीही केल्या. त्यानंतर विद्यापीठाने परीक्षा रद्द करून पुन्हा घेणार असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा - उत्तराखंडमधील आजीबाईंची शाळा!