कोल्हापूर - वाढीव व थकीत मानधन मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या दोन हजार आशा वर्कर्सना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी कार्यमुक्तीचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आशा वर्कर्सनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनाच घेराव घातला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेला प्रकार चुकीचा असून त्यांचे कार्यमुक्तीचे आदेश मागे घेण्याच्या सूचना केल्या. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोरच अमन मित्तल यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली.
प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी
'माझे कुटुंब माझी जबाबदारी' सर्वेचे मानधन न मिळाल्यामुळे आशा वर्कर्स आक्रमक झाल्या आहेत. कोरोना काळात काम केले मात्र मानधन देण्यास कोल्हापूर जिल्हा परिषदेची टाळाटाळ होत आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सुमारे दोन हजार आशा वर्कर्सनी सोमवारी (दि. 7 डिसें.) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मुख्य आरोग्य सचिवांना दिल्या सूचना
संकटाच्या काळात जिवाची पर्वा न करता दारोदारी जाऊन सर्वेचे काम केले. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला कार्यमुक्तीचे आदेश दिले. हे कितपत योग्य आहे, अशी भूमिका घेत थेट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना आशा वर्कर्स युनियनच्या महिला पदाधिकाऱ्यांना घेराव घातला. त्यावेळी कार्यमुक्तीचे आदेश दिल्याने संतप्त झालेल्या महिला वर्कर्सनी मुश्रीफ यांच्या समोरच मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांची कानउघाडणी केली. त्यावर मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करत, कार्यामुक्तीचे आदेश परत घेण्याचा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांना दिल्या. तसेच राज्याचे मुख्य आरोग्य सचिवांशी फोनवरून संपर्क साधून राज्यातील आशा कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व वाढीव मानधन त्वरित द्या, अशा सूचना दिल्या.
आशा वर्कर्स आणि गट प्रवर्तक यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे
- शासनाने दिलेल्या निर्णयानुसार आशा यांना दोन हजार रुपयांची वाढ व गटप्रवर्तकांना तीन हजार रुपये वाढ जुलैपासून मिळणार होती. मात्र, अद्यापही ही मिळाली नाही ती तत्काळ देण्यात यावी.
- गटप्रवर्तक यांचा 625 फिरती भत्ता कमी केला तो देण्यात यावा.
- मागील वर्षी पूरपरिस्थिती मध्ये केलेल्या सर्व्हेचे मानधन मिळावे.
- आयुष्यमान भारतमध्ये 50 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांनी सर्वे केला आहे. त्याचेही मानधन तत्काळ मिळावे.
हेही वाचा - दादांना वाटतंय सगळं जग ताब्यात असले पाहिजे; मात्र निकालातून चपराक - सतेज पाटील
हेही वाचा - आमच्या बायकांना लुगडी मिळणात, पोरांची लग्न हुईनात आणि नेत्यांच्या बायका...! कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा संताप