कोल्हापूर - एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे निम्मे वर्षे ऑनलाइल क्लासमध्ये गेले असूनही जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांनी 12वीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. इतर वेळी फेब्रुवारी महिन्यातच अभ्यासक्रम पूर्ण झालेला असतो, मात्र यावर्षी विद्यार्थ्यांबरोबरच कॉलेज आणि शासनाचीही मोठी कसोटी लागली होती. मात्र 25 टक्के अभ्यासक्रम कमी करून शासनाने कॉलेज तसेच विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे सर्वच कॉलेजमधील 12वीचा अभ्यासक्रम जवळपास पूर्ण झाल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील 'गोखले कॉलेज'चे उपप्राचार्य संजय पिसाळ यांनी माहिती दिली आहे, पाहुया...
शासनाने 25 टक्के अभ्यासक्रम केला कमी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांच्या मनावर ताण दडपण येऊ नये, यासाठी 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या पहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. त्यामुळे शाळा-कॉलेज बरोबरच विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळालेला होता. कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वारंवार लॉकडाऊनही वाढवण्यात आले होते. त्यामुळे शाळाही सुरू करणे कठीण बनले होते. मात्र तरीही ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवून तब्बल 25 टक्के अभ्यासक्रम कमी केल्याने सर्वांना दिलासा मिळाला होता.
जादा तास घेऊन केला अभ्यासक्रम पूर्ण
कोरोनामुळे शाळा, कॉलेज कधी सुरू होणार याबाबत कोणाला काहीच कल्पना नव्हती. मात्र शासनाने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर करत कॉलेज सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यातल्या प्रत्येक कॉलेजने ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू केले. नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात कॉलेज सुरू झाले. तोपर्यंत 40 टक्के इतका अभ्यासक्रम पूर्ण झाला होता. कॉलेज सुरू झाल्यानंतर उरलेला अभ्यासक्रम पूर्ण केला असल्याचे गोखले कॉलेजचे उपप्राचार्य संजय पिसाळ यांनी माहिती दिली. शिवाय काही विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणसाठी व्यवस्था नव्हती, त्यांचीसुद्धा अडचण लक्षात घेऊन त्यांनाही कशा पद्धतीने शिक्षण देता येईल, याबाबत कॉलेजकडून प्रयत्न केले गेले.
राबविल्या विविध उपाययोजना
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर प्रत्यक्षात जेव्हा महाविद्यालय सुरू करण्यात आले, तेव्हा अनेक समस्या समोर होत्या. सोशल डिस्टन्स नियमामुळे एकाच वर्गात सर्व विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. काही विद्यार्थ्यांचे गट पाडून टप्प्याटप्प्याने त्यांना विविध वर्गखोल्यांमध्ये शिक्षण सुरू केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होऊ नये, हे पाहणेही खूपच जबाबदारीचे काम होते. त्यामुळे या अडचणींवर मात करून शेवटी अभ्यासक्रम पूर्ण करत आणला. शिवाय प्रॅक्टिकल्सही तब्बल 60 टक्क्यांहून अधिक पूर्ण केली आहेत. सध्या पूर्व परीक्षेची तयारी सुरू आहे. त्या आता ऑनलाइन पद्धतीने घेणार असून बोर्डाची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे पिसाळ यांनी म्हटले आहे.