कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याला आम्ही विरोध केला होता. शिवाय शिवाजी विद्यापीठातील दीक्षांत समारंभाला ते आले असते तर आम्ही कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यामुळे त्यापूर्वीच ही आनंदाची बातमी आम्हाला समजली आहे, असे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले. राज्यापालांच्या राजीनामा मंजूरीवर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
राज्यपालांचे पक्षासाठी काम : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. शिवाय राज्यपाल हे एका विशिष्ठ पक्षासाठी काम करत होते. यामुळे राज्यपाल पदाच महत्व सुद्धा कमी झाले होते. आता कोश्यारी गेले त्यामुळे नवीन राज्यपाल महाराष्ट्र राज्यासाठी चांगले काम करतील, अशी अपेक्षा संजय पवार यांनी व्यक्त केली आहे.
आमचा विरोध होताच : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. राज्यपालांना कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला निमंत्रण देण्यात आले होते. या दीक्षांत समारंभाला कोश्यारी यांना कोणत्याही परिस्थितीत बोलवू नये, अन्यथा सेनेच्या पद्धतीनेच त्यांना आम्ही रोखू अशापद्धतीचा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून देण्यात आला होता. काल शनिवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जेलभरो आंदोलन करत त्यांनी हा इशारा दिला होता.
राज्यासाठी काम करावे : ते पुढे म्हणाले की, आमचा विरोध असूनही जर राज्यपाल इथे आले तर दीक्षांत समारंभ कार्यक्रम उधळून लावू, असा इशाराही यावेळी देण्यात आला होता. मात्र, आता राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जागी नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही आमच्यासाठी आनंदाची बातमी असून नवीन राज्यपालांनी राज्यासाठी काम करावे असेही त्यांनी सांगितले.