कोल्हापूर - मधुमेह आजारात भारत आता जगभरात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. झपाट्याने वाढत असलेले शहरीकरण, बदललेली जीवनशैली, आहारातील बदल, मानसिक ताण आशा अनेक कारणांनी मधुमेह रुग्णांमध्ये दिवसेंदिवस प्रचंड वाढ होऊ लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा मधुमेहाचे प्रमाण अतिशय वाढल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवनशैलीमध्ये कसा बदल करायला हवा ? मधुमेहावर काय उपाय आहेत ? आणि मधुमेहाच्या रुग्णवाढीमागे नेमकी कोणकोणती कारणे आहेत याबाबत 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट...
मधुमेहाचे प्रकार -
रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह. या मधुमेहाचे टाईप 1 आणि टाईप 2 असे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. यातील पहिल्या प्रकारात शरीरामध्ये इन्सुलिन नाममात्र तयार होत असते. दुसऱ्या प्रकारात शरीरातील इन्शुलिनच्या क्षमतेला अडथळा निर्माण होतो त्यामुळे शरीरातल्या रक्तातील साखरेत वाढ होऊ लागते.
मधुमेहाची प्रमुख कारणे -
वाढते शहरीकरण आणि बदललेली जीवनशैली हे एक मधुमेहामागचे महत्वाचे कारण आहे. सद्याच्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आहारात सातत्याने बदल होत आहेत. वाढती व्यसनाधिनता, जास्तीची झोप, मांसाहारी जेवण, दूध-दह्याचे पदार्थ, सतत गोड पदार्थ खाणे, ताणतणाव घेणे, जंगफूड वारंवार खाणे, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, भरपेट जेवण करण्याच्या सवयीमुळे, भूक लागली नसतानाही खाणे अशी अनेक कारणे मधुमेहाला निमंत्रण देत असतात. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील आजी, आजोबा, आई किंव्हा वडील यांच्यापैकी कोणालाही यापुर्वी मधुमेह असल्यास अनुवांशिकतेमुळे मधुमेह होऊ शकतो.
मधुमेहाची लक्षणे -
मधुमेह काहीवेळा सोप्या पद्धतीचा सुद्धा असू शकतो, त्यामुळे याची लक्षणे दिसतीलच असेही नाही. मात्र, यामध्ये प्रामुख्याने अशक्तपणा येणे, चक्कर येणे, अधिक भूक लागणे, अचानकपणे वजन घटणे, वारंवार लघवीला जावे लागणे, वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे, हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे, डोळ्यांचे आणि त्वचेचे विकार होणे, जखम भरून येण्यास जास्तीत जास्त कालावधी लागण्यासारखी लक्षणे आढळतात.
मधुमेहाच्या रुग्णांनी काय करावं -
1) कॅलरीच्या प्रमाणात खाणे - सद्याच्या या धावपळीच्या जीवनात आपल्या आहारावर लक्ष ठेवण्यासाठी अनेकजण वेळ नाहीये असे कारण सांगत असल्याचे पाहायला मिळतात. मग अवेळी जेवण किंवा वारंवार बाहेरचे खाणे यामुळे योग्य कॅलरी आपल्या पोटामध्ये आहार जात नाही. त्यामुळे आहार तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन घरून आपल्या आपल्या शरीररचनेवरून गरजेचा असेल तितकाच आहार घेणे गरजेचे आहे. शिवाय वेळेवर आहार न घेतल्यास मधुमेह रुग्णांमध्ये हायपोग्लायसेमिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचीही काळजी घ्यावी.
2) मधुमेही रुग्णांना दर चार तासांनी थोडे थोडे खाणे आवश्यक असते. एका वेळेस पोटभर जेवणे रुग्णांनी टाळले पाहिजे. यामध्ये प्रामुख्याने फळभाज्या, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, नाचणी हातसडीचा तांदूळ, कमी गोड फळे खाणे फायदेशीर असते.
3) मधुमेही रुग्णांनी बेकरीतील पदार्थ शक्यतो टाळावेत. शिवाय साखरेचे पदार्थ, मिठाई, तेलकट पदार्थ, अंड्यातील पिवळा भाग, खारट पदार्थ, त्याचबरोबर कंदमुळे सुद्धा या रुग्णांनी टाळली पाहिजेत
4) मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. यामध्ये सकाळी किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा, नियमित योगासने करावीत, रात्री पुरेशी झोप घ्यावी, दुपारी झोपू नये, सतत कामात सक्रिय रहावे. सर्वात महत्वाचे म्हणजे या रुग्णांनी कोणत्याही तणावामध्ये राहू नये. आपल्या कुटुंबासमवेत त्यांनी वेळ घालवावा शिवाय मोबाईलचा वापर कमी करावा आशा महत्वाच्या गोष्टींवर लक्ष दिल्यास मधुमेह आटोक्यात राहण्यास नक्कीच मदत होते.
दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने पाळल्यास मधुमेहावर सुद्धा आपण विजय मिळवू शकतो. त्यामुळे मधुमेहाशीच मैत्री करा आणि मजेत जगा असा कानमंत्र सुद्धा डॉक्टर संदीप पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला.