कोल्हापूर : लोकसभा पराभवाची सल अजूनही खदखदत असून लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या जखमा 'मी' विसरलो नाही. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटंलय. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. परंतु दिवंगत अपक्ष उमेदवार सदाशिराव मंडलिक यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा पराभव केला होता.
चर्चेसाठी सर्व दरवाजे खुले : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वराज्य पक्षाचे उमेदवार कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक वगळता इतर कोणत्या जागा लढवू शकतात, याबाबत स्वराज्य पक्ष लवकरच स्पष्ट भूमिका घेणार असल्याचंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलय. स्वराज्य पक्षाला सोबत घेऊन महायुती, महाविकास आघाडी लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचं सांगत आहेत. ही आमच्यासाठी सकारात्मक बाब असून चर्चेसाठी सर्व दरवाजे खुले, असल्याचं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलंय.
लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं वक्तव्य करावे : प्रभू श्रीराम यांच्या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन होऊ शकत नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आहे. जातीय तेढ वाढवणारी वक्तव्ये लोकप्रतिनिधींनी करू नये, तसंच त्यांनी जबाबदारीचं भान ठेवावं, असं संभाजीराजेंनी आव्हाडांना उद्देशून म्हटलंय.
मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका ठरवा : 20 जानेवारीपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. आरक्षणासंदर्भात चर्चेची गुऱ्हाळं खूप झाली. आता राज्य सरकारनं आरक्षण देण्यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावं. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अवघा आठवडा उरला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळं मराठा समाजात संभ्रमाची अवस्था आहे. सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण येणं गरजेचं असल्याचंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.
काँग्रेस आमदार पी. एन. पाटलांना 'खास शुभेच्छा' : करवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचा वाढदिवस असल्यानं शुभेच्छा देण्यासाठी संभाजीराजे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. आमदार पाटील तसंच आमच्या घराण्याचे संबंध पूर्वापार आहेत. यामुळंच आमदार पाटील यांना खास शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले, अशी प्रतिक्रिया यावेळी संभाजीराजेंनी व्यक्त केली.
हेही वाचा -