कोल्हापूर - प्रत्येकजण 'व्हॅलेंटाईन डे' आपापल्या प्रियजनांसोबत साजरा करत असतात. एकमेकांना भेटवस्तू देत असतात. मात्र, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने आज 'प्रेम यात्रा' उपक्रमाच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांसोबत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला. कोरोना काळात स्वतःच्या जिवाची बाजी लावून अहोरात्र झटणार्या कोरोना योद्ध्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. त्यांना प्रेम दिले पाहिजे, या भावनेतून शेतकरी, सफाई कर्मचारी, पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांना गुलाब पुष्प देत अनोख्या पद्धतीने या वर्षीचा 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यात आला.
स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील विविध ठिकाणी जाऊन या योद्ध्यांसोबत आजचा हा दिवस साजरा केला. शिवाय, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा केलेल्या अवाहनानुसार कोरोना योद्ध्यांसोबत आजचा दिवस साजरा केला.
भाजीविक्रेत्यांना मास्कचे वाटप
लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या सेवेसाठी सफाई कर्मचाऱ्यांपासून, शेतकरी, पोलिसांपासून डॉक्टरांपर्यंत सर्वांनी आपापले योगदान दिले आहे. यामध्ये भाजी विक्रेत्यांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडली. स्वतः कोरोना संसर्ग होण्याचा धोका असून सुद्धा त्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी आज त्यांना गुलाब आणि मास्क देण्यात आले.
जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सुद्धा पार पडला कार्यक्रम
14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस अर्थात 'व्हॅलेंटाईन डे' सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने जयसिंगपूर येथील कोरोना योद्ध्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे हा कार्यक्रम पार पडला. लॉकडाऊनच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अहोरात्र झटत होते. डॉक्टर्स तसेच परिसेविका, आशासेविका आदींनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले. सफाई कामगारांनी शहर स्वच्छ ठेवण्याचे काम केले. शेतकर्यांनी अहोरात्र कष्ट करून शिवारात अन्नधान्य पिकवण्याचे काम केले. आपल्या या कामात कुठेही खंड पडू दिला नाही. या सर्वांचा विद्यार्थी परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सौरभ शेट्टी, स्वप्निल चौगुले, आण्णा सुतार, पवन देसाई, श्रीकृष्ण नरळे, अक्षय खोत, निरंजन भोसले, अमन बैगुलजी, पृथ्वी भोसले, यासीन पेंढारी आदी उपस्थित होते.