कोल्हापूर - लाॅकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिल माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज मोर्चा निघणार आहे. इचलकरंजी येथील प्रांत कार्यालयावर हा मोर्चा निघणार असून हजाराेंच्या संख्येंने नागरिकांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाऊन नंतर सर्वसामान्य नागरिक प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. असे असताना शासनाने वाढीव बीजबिल देऊन त्यांच्या संकटात अधिक भर टाकली आहे. शिवाय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देऊ असे म्हटले होते मात्र आता आलेले बिल भरावेच लागेल असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांना अशी घोषणा करण्याची परवानगीच नव्हती तर त्यांनी या वल्गना का केल्या? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.
लॉकडाऊन काळात अंदाजे रिडींग टाकले आणि ग्राहकांच्या माथ्यावर मारले -
लॉकडाऊन काळात सर्वच ठप्प असल्याने महावितरण कंपनीने सर्वच ग्राहकांचे अंदाजे रिडींग घेतले. त्यामुळे याचा मोठा भुर्दंड अनेकांना सोसावा लागला आहे. शिवाय अंदाजे घेतलेले रीडिंग आम्हा ग्राहकांच्या माथ्यावर मारले गेले आहे. आशा वेळी एखादे पॅकेज देऊन वीजबिल माफ करणे गरजेचे होते, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.
राऊत यांनी परवानगीशिवाय वल्गना का केल्या - शेट्टी
लॉकडाऊननंतर सर्वांचेच वीजबिल वाढून आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून याच्या विरोधात मोर्चा आंदोलन झाली आहेत. त्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विजबिलात सवलत देणार असल्याबाबतची घोषणा केली. मात्र आता त्यांनी वीजबिल भरावेच लागेल असे म्हणत अनेकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यांना जर आशा पद्धतीची घोषणा करण्याची वरिष्ठांकडून परवानगी नव्हती तर त्यांनी अशी वल्गना का केली, हा प्रश्न असल्याचेही शेट्टी यांनी म्हटले आहे.
3 महिन्यांचे वीजबिल माफ होईपर्यंत गप्प बसणार नाही -
कोणत्याही पद्धतीने वीजबिल वसूल करण्याचा प्रयत्न झाल्यास गाठ स्वाभिमानीशी आहे असे शेट्टी म्हणाले. तसेच 3 महिन्यांचे वीजबिल माफ होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा सुद्धा शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.
गांधी पुतळ्यापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा -
आज सकाळी 11 वाजता गांधी पुतळ्यापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत स्वाभिमानीचा मोर्चा निघणार आहे. यामध्ये ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिक, यंत्रमाग व्यावसायिक, उद्योजक असे हजारो नागरिक सहभागी होणार आहेत.
हेही वाचा - येत्या दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येणार, रावसाहेब दानवेंचा दावा
हेही वाचा - काही दिवसातच कोसळणार आघाडी सरकार; दरेकरांची हिंगोलीत भविष्यवाणी