कोल्हापूर - काँग्रेस-राष्ट्रवादीशी काडीमोड घेत स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. कोल्हापुरात काल (शुक्रवार) रात्री झालेल्या प्रदीर्घ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडे सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर आणि काही कार्यकर्त्यांच्यामध्ये रात्री ५ तास बैठक चालली होती. कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये रात्री ११ ते पहाटे ४ पर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या २७ तारखेला माढ्यामध्ये एल्गार मेळावा घेण्यात येणार आहे. बुलडाणा, वर्ध्याच्या जागा लढण्यावर स्वाभिमानी ठाम आहे. २८ तारखेला राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे.