कोल्हापूर - खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून, राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आमदारकी देण्याची घोषणा केली आहे. यानंतर स्वाभिमानी पक्षातूनच टीका व्हायला सुरुवात झाली आहे. राजू शेट्टी यांच्या सर्वात जवळ असलेल्या दोन पदाधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या निर्णयावर थेट नाराजी व्यक्त केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील आणि नुकतीच शिरोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले सावकार मादनाईक हे दोघेही नाराज झाले आहेत. गेल्या अनेक वर्ष आम्ही चळवळीत काम करतोय. आम्हाला सुद्धा पदाची इच्छा का असू नये? म्हणत या पदाधिकाऱ्यांनी शेट्टींवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्वाभिमानीत फूट पडते की काय? अशी परिस्थिती या दोन्ही कार्यकर्त्यांच्या नाराजीवरून दिसून येत आहे. दरम्यान, स्वाभिमानीत फूट पडल्यास शेतकरी चळवळीचे मोठे नुकसान होणार यात शंका नाही.
कोण आहेत प्रा. जालंदर पाटील?
प्रा. जालंदर पाटील हे राजू शेट्टी यांचे सर्वात जवळचे मानले जाणारे कार्यकर्ते आहेत. शेट्टी यांच्यासोबत गेल्या 20 वर्षांपासून ते सोबत आहेत. दरवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे ऊस परिषदेत पार पडते. यामध्ये जालंदर पाटील यांचे अभ्यासपूर्ण भाषण असते. आजपर्यंत पार पडलेल्या स्वाभिमानीच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आहे. रविकांत तुपकर यांनी जेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हा शेट्टींनी त्यांच्या जागी प्रा. जालंदर पाटील यांना संधी देत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष केले.
कोण आहेत सावकार मादनाईक?
सावकार उर्फ अनिल मादनाईक सुद्धा शेट्टी यांचे खंदे समर्थक मानले जातात. २०१९ विधानसभेच्या निवडणुकीत शिरोळ विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र किरकोळ मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र सद्या राज्यपालांच्या कोट्यातून स्वाभिमानीला एक जागा देण्यात येणार, अशी बातमी आली आणि शेट्टी स्वतः आमदारकी स्वीकारणार की कार्यकर्त्याला संधी देणार? असे प्रश्न उपस्थित झाले होते. असाच प्रश्न सावकार मादनाईक यांच्या मनातही उपस्थित झाला. मात्र शेट्टींनी शरद पवारांची भेट घेत स्वतःच्या नावावर शिक्कामोर्तब करून आले यामुळे मादनाईक नाराज झाले.
कार्यकर्त्यांनी अजून किती सहन करायचे, शेट्टी यांनी कार्यकर्त्यांची तिलांजली दिली आहे, असे म्हणत शेट्टींच्या जवळच्या कार्यकर्त्यानेच टीका केल्याने आता स्वाभिमानीत फूट पडते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्वाभिमानीतून बाहेर पडून 'जय शिवराय किसान संघटना' या दुसऱ्या संघटनेची स्थापना केलेल्या शिवाजीराव माने यांनी सुद्धा शेट्टींच्या निर्णयानंतर त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शेट्टींनी आमदारकीसाठी स्वतःचा स्वाभिमान सोडला असल्याची त्यांनी जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, सावकार मादनाईक आणि प्रा. जालंदर पाटील नाराजीनंतर कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून ते स्वाभिमानीत राहणार की सदाभाऊ खोत, शिवाजीराव माने यांच्यासारखीच आणखी एक संघटना काढतात हेच पाहावे लागणार आहे.
हेही वाचा - किती हे कॅमेरा प्रेम! घरही बांधले कॅमेरासारखे आणि चक्क मुलांचीही नावे ठेवली कॅनॉन, निकॉन, इपसॉन
हेही वाचा - पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर; घाट परिसरात आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात