कोल्हापूर Swabhimani Agitation Success: याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर साखर कारखान्याचे धुराडे पेटणार आहेत. स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश आल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर गुलालाची उधळण करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. (Raju Shetty) आज दुपारी चारच्या दरम्यान कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी अचानक आंदोलन स्थळी येऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. यावेळी बोलताना शाहू महाराजांनी आता जो दर मिळत आहे तो राजू शेट्टी यांच्यामुळे मिळत आहे. त्यामुळे कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या हक्काचं असलेलं शेतकऱ्यांच्या पदरात द्यावं असं आवाहन केलं. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी भूमिका मांडताना साखर कारखानदार आणि आमच्यात चर्चा सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील सात साखर कारखाने शंभर रुपये दुसरा हप्ता देण्यास तयार आहेत. बाकीचे कारखानदार अजूनही तयार नाहीत. त्यामुळे शंभर रुपयांचा दुसरा हप्ता मिळाल्याशिवाय जागेवरून हटणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे.
शेतकऱ्यांचा प्रस्ताव मान्य: यानंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील, वैभव कांबळे, सावकार मादनाईक यांच्यासह शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेसाठी गेले. या चर्चेत मागील हंगामात 3 हजार पेक्षा अधिक दर दिलेल्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना पन्नास रुपये अतिरिक्त द्यावेत तर 3 हजार पेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी शंभर रुपये अतिरिक्त द्यावेत, असा प्रस्ताव मान्य केला. याबाबतचे लेखी आश्वासन घेऊन शिष्टमंडळ आंदोलन स्थळी आले आणि यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. स्वाभिमानीने केलेल्या चक्काजाम आंदोलनाला यश आल्यानंतर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
मीडियाच्या प्रतिनिधींवर कार्यकर्ते धावले: आंदोलनाला यश आल्यानंतर जमलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना राजू शेट्टी यांनी हे आंदोलन आता सांगली जिल्ह्यातही करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज राहावं असं आवाहन केलं. यानंतर जमलेल्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला; मात्र वार्तांकन करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींच्या अंगावर हुल्लडबाज कार्यकर्ते धावून गेले. यानंतर आंदोलन स्थळी गोंधळ झाला. आंदोलनाला यश आलं मात्र कार्यकर्त्यांमुळे यशस्वी झालेल्या आंदोलनाला गालबोट लागल्याची चर्चा आंदोलनस्थळी सुरू होती.
हेही वाचा: