कोल्हापूर - गोकुळ दूध संघाची निवडणूक रविवारी पार पडली. मंगळवार 4 मे रोजी रमणमळा येथे मतमोजणी होणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही विजयी मिरवणूक, रॅली काढू नये असे पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी आवाहन केले आहे. जे कोणी नियमांचे उल्लंघन करून मिरवणूक काढतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.
केवळ मोजक्याच व्यक्तींना मतमोजणी ठिकाणी प्रवेश -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नियमांचे उद्या मतमोजणीच्या ठिकाणी काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार तसेच मतमोजणी प्रतिनिधी व्यतिरिक्त कोणालाही मतमोजणी ठीकाणी प्रवेश नसणार आहे. शहराबाहेरच्या नागरिकांना सुद्धा मतमोजणी ठिकाणी यायला परवानगी नाही आहे. केवळ 74 लोकांनाच त्याठिकाणी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या परिसरात गर्दी करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी केले आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कुठेही रॅली, मिरवणूक काढायला परवानगी नसून त्याचे सर्वांनी पालन करायचे आहे. अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येतील असेही बलकवडे यांनी म्हंटले आहे.