कोल्हापूर - ऊसतोड मजुरांना त्यांची गावी पाठविण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. त्यानुसार कोल्हापुरातील विविध भागात असलेल्या ऊसतोड मजुरांना आजपासून एसटी बसमधून त्यांच्या गावी पाठविण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
कोल्हापुरात जवळपास साडेअकरा हजार ऊसतोड मजूर कामासाठी आले होते. पण, लॉकडाऊनमुळे ते इथेच अडकून पडले होते. दरम्यान, गेल्या एक आठवड्यापासून सोसाट्याच्या वारा आणि अवकाळी पावसामुळे या सर्व मजुरांच्या झोपड्या अक्षरशः जमीनदोस्त झाल्या होत्या. दररोजच सायंकाळी पावसाचे वातावरण तयार होत होते. त्यामुळे या मजुरांचा कोरोनाविरुद्धच्या लढाईसोबतच जगण्यासाठी सुद्धा लढाई सुरू होती. याबाबतचे वृत्त 'ईटीव्ही भारत'ने १७ एप्रिलला प्रसिद्ध केले होते. अशीच काहीशी परिस्थिती राज्यातील अनेक भागात होती. त्यामुळे राज्य सरकारने सुद्धा त्यांना त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने मात्र याची तत्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे.
ईटीव्ही भारतने १७ एप्रिलला प्रसिद्ध केलेले वृत्त - कोरोनाविरुद्धच्या लढाईसोबतच ऊसतोड कामगारांची जगण्यासाठीही लढाई
जिल्ह्यात एकूण ११ हजार ५०० ऊसतोड मजूर आहेत, ते सर्व येत्या दोन दिवसात आपआपल्या जिल्ह्यामध्ये पोहोचतील, असेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या गावी पोहोचल्यानंतर त्यांची तिथल्या प्रशासनाकडून तपासणी करण्यात येईल. ऊसतोड मजुरांबरोबरच परराज्यातील 2 हजार 500 कामगारांची सुद्धा जिल्ह्यातील निवारागृहामध्ये व्यवस्था केली आहे. त्यांना सोडण्याबाबत केंद्र शासनाच्या अजून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. सूचना येतील त्यावेळी याबाबत कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.