कोल्हापूर - पाच हजारांची लाच स्वीकारताना कोल्हापुरातल्या वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. चंद्रकांत श्रीपती भोसले (वय 55, रा. प्लॉट नं. 30, भोसलेवाडी, कोल्हापूर) असे लाचखोर उप निरीक्षकाचे नाव आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपींना तपासात मदत करण्यासाठी भोसले याने 5 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाच स्वीकारताना आज त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आज दुपारी ही कारवाई झाली आहे. गेल्या 15 दिवसांमधील ही तिसरी मोठी कारवाई ठरली आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार -
वडगाव पोलीस ठाण्यात कलम 306, 498 (अं), 504, 506, 34 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपीला त्यांच्या गुन्ह्यातील तपासात मदत करतो असे वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षण चंद्रकांत भोसले याने सांगितले होते. यासाठी 5 हजार रुपयांच्या लाचेची सुद्धा त्याने मागणी केली होती. तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाकडून याबाबत पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आज सापळा लावला असता लाचखोर संशयित आरोपी चंद्रकांत श्रीपती भोसले रंगेहाथ सापडला. त्यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास सुरू आहे. ही कारवा पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत आणि त्यांच्या पथकाने केली.
दोन दिवसांपूर्वी उपकोषागार अधिकारी जाळ्यात -
दोन दिवसांपूर्वी औषध खरेदीची बिलं मंजूर करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना कागल मधील उपकोषागार अधिकारी रंगेहात सापडला होता. मिलिंद मधुकर कुलकर्णी (वय 55 रा. शाहू पार्क, राजेंद्र नगर, कोल्हापूर) असे त्या अधिकाऱ्याचे नाव होतं. त्यानंतर लगेचच पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्यात आली आहे.