कोल्हापूर - यंदाच्या महापुराचा फटका कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक बसला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचे पुनर्वसन व्हावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, काही गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याऐवजी तात्पुरते पुनर्वसन करावे, असा अनेकांचा आग्रह आहे. मात्र, राज्य सरकार कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी आग्रही आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'मंगळवारपर्यंत 100% पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश' -
कोल्हापूर जिल्ह्यात शेतीसह प्रापंचिक साहित्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. जिल्ह्यातील दोन तालुके वगळता इतर तालुक्यातील शेतीचे 100% पंचनामे पूर्ण झाले आहेत. घरांच्या पडझडीचे चार ते पाच टक्के पंचनामे शिल्लक आहेत. मंगळवारपर्यंत 100% पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यात पूरग्रस्त नागरिकांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने 17 कोटीची निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत पूरग्रस्तांना प्रत्येकी दहा हजार असा सानुग्रह अनुदान खात्यावर वर्ग केले जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
'अनेक गावांचे शंभर टक्के पुनर्वसन व्हावे' -
दरवर्षी येणाऱ्या महापुराचा फटका अनेक गावांना बसतो. नदी शेजारी असणाऱ्या गावांनादेखील त्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा ठिकाणाचे पुनर्वसन करण्यासाठी येणाऱ्या काही दिवसांत स्थानिक आमदार अधिकारी यांच्यासोबत बैठक होणार आहे. वेगवेगळ्या योजनांमधून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अनेक गावांचे शंभर टक्के पुनर्वसन व्हावे, अशी इच्छा आहे. तर अनेक गावांमध्ये कायमचे पुनर्वसन न करता तात्पुरते पुनर्वसन करावे, अशी मागणी आहे. मात्र, राज्य सरकार कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी आग्रही आहे, असे ते म्हणाले म्हणाले.
'तोपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा' -
पूरग्रस्तांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. पूरग्रस्तांना धीर सोडू नये, झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, जोपर्यंत 100% पंचनामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा. कोरोना संकट संपलेले नाही. मोर्चा काढू नका. लवकरच मदतीची घोषणा केली जाईल. अध्यादेश काढल्यानंतर काही शंका असेल तर चर्चा करुया. मात्र मोर्चा काढून कोरोनाला आमंत्रण देऊ नका, अशी विनंतीही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
'पैसे मिळण्यास डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल' -
कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या विकास कामासाठी दोन टप्प्यात पैसे मिळतील. प्रस्ताव पाठवल्यानंतर मंजुरी आणि पैसे मिळण्यास डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल, असे पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले. पूर परिस्थिती वर कायमचा उपाय योजना करण्यासाठी जिल्ह्यातील ओढे नाल्यांचे सर्वेक्षण करुन योग्य तो अभ्यास केला जाणार आहे. ज्या ओढे नाल्यांचे रुंदीकरण करायचे असल्यास त्याचे काम केले जाईल. तसेच ज्या ओढ्यांवर अतिक्रमण झाले असेल, ते काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री म्हणाले.
हेही वाचा - नारायण राणेंनी अभिवादन केल्यानंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण