कोल्हापूर - कोरोना महामारीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता प्रवासी वाहतूक सुरळीतपणे पार पाडली. मात्र त्याच एसटी कर्मचाऱ्यांचे मागील महिन्यांचे वेतन मिळाले नाही. दोन महिन्यांचे थकीत वेतन मिळवण्यासाठी एसटी कर्मचारी ९ नोव्हेंबरला राज्यभरात कुटुंबीयांसह आक्रोश आंदोलन करणार आहे, अशी माहिती एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.
एसटी कामगारांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. ऑक्टोबर महिन्याचे वेतनही दिवाळीपूर्वी एसटीकडून कर्मचाऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. त्यासोबतच महागाई भत्ता आणि दिवाळी अग्रिमची कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांचे प्रलंबित वेतन अद्याप मिळाले नाही. दरम्यान 2 नोव्हेंबर रोजी राज्यपातळीवर प्रत्येक जिल्हा, तालुका पातळीवर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन दिले आहे. तर 9 नोव्हेंबर रोजी एसटी कर्मचारी आपल्या कुटुंबासह आक्रोश आंदोलन करणार आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
-तीन महिन्यांचे प्रलंबित वेतन
-करारातील तरतुदीप्रमाणे राज्य सरकारला लागू केल्याप्रमाणे महागाई भत्ता
-सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे व करारातील तरतुदीप्रमाणे दिवाळी सण अग्रिम
-मागणीप्रमाणे दिवाळी भेट