कोल्हापूर - 5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.
कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई -
शाळेत असो किंवा कॉलेज ज्या ज्या ठिकाणी मी शिकलो त्या त्या ठिकाणी मी तेथील गुरुंचा आवडता शिष्य होतो. गुरुंचा आवडता असल्याने जबाबदारी सुद्धा वाढते आणि यातच माझ्या यशाचे गमक असल्याचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हटले आहे. शिवाय माझे पहिले गुरू म्हणून मला माझ्या वडिलांची आठवण होते, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
ते म्हणाले, माझ्या आयुष्यातील पहिले गुरू हे माझे वडीलच होते. त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मात्र, गुरू म्हणून वडिलांनी आपली जी भूमिका बजावली होती ती अतिशय वेगळ्या प्रकारची होती. त्यांनी मला शिकवण्याच्या स्वरुपातले ते गुरू आहेत, असे कधीही भासू दिले नाही. स्वतःचे आचरण आणि आपल्या मुलाचे आचरण कसे असावे, याबाबत असणाऱ्या त्यांच्या कल्पनेतून त्यांनी त्यांच्या गुरुची भूमिका चांगल्या प्रकारे बजावली. त्यामुळे माझ्या मनावर हे नेहमी बिंबवले गेले.
त्यानंतर शाळा, हायस्कूल, कॉलेज किंवा ज्या ठिकाणी परदेशातही शिकलो. त्या त्या ठिकाणचे सर्वच गुरुंचा माझ्या प्रवासावर प्रभाव होता. मात्र, माझ्याबाबतीत एक वेगळेपण होते. शाळा आणि कॉलेजमध्ये सुद्धा गुरुंचा मी आवडता विद्यार्थी असायचो. आपण आपल्या गुरुंचा आवडीचा बनल्यामुळे चांगल्या पद्धतीने कसे राहायचे किंवा गुरुंना नाराज कसे करायचे नाही याचे कौशल्य वेळोवेळी येत गेले, यातच माझ्या यशाचे गमक आहे, अशी भावना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केली.