कोल्हापूर : शहरातील सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला आज पहाटे तीनच्या सुमारास आग लागली होती. ही आग लागलीच विझविण्यात आली, तसेच, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सीपीआर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, यावेळी झालेल्या धावपळीमध्ये तिथे उपचार घेत असलेल्या पित्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा करत, त्याच्या मुलाने याबाबत चौकशीची मागणी केली आहे.
ट्रॉमा केअर सेंटरमध्ये एकूण 15 रुग्णांवर उपचार सुरू होते. आगीची माहिती मिळताच त्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे सीपीआरकडून सांगण्यात आले. मात्र पहाटे अचानक लागलेल्या आगीनंतर प्रशासनाची धावपळ उडाली. यामध्ये अनेक रुग्ण घाबरले होते. यापरिस्थितीत रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणे सुद्धा आव्हानात्मक होते. मात्र प्रशासनाने शक्य तितक्या लवकर रुग्णांना दुसऱ्या विभागात शिफ्ट करून त्यांच्यावर उपचार सुरू केले.
23 सप्टेंबरपासून याच विभागात विजयकुमार कांबळे या रुग्णावर उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने त्यांचा पहाटे मृत्यू झाल्याचा सीपीआर प्रशासनाकडून नातेवाइकांना निरोप देण्यात आला. कांबळे यांचा मुलगा विनायक कांबळे आणि त्यांचे घरचे तात्काळ सीपीआर रुग्णालयात आले. त्यांना सुरुवातीला आगीबाबत काहीच कल्पना नव्हती. मात्र रुग्णाला दुसऱ्या विभागात पहाटे शिफ्ट करण्यात आले असल्याबाबत सांगण्यात आले. अशा प्रकारच्या घटनेनंतर कोणीही घाबरून जाणारच, असे म्हणत वडिलांच्या मृत्यूबाबत चौकशी करावी, अशी मागणी विजयकुमार कांबळे यांच्या मुलाने केली आहे.
हेही वाचा : कोल्हापुरात किरकोळ कारणावरुन मुलाने छातीत कात्री खुपसली; वडील जागीच ठार