कोल्हापूर : शेअर मार्केटींगमधून मिळालेला पहिलाच मोठा नफा येथील जे. के. वेल्थमधील विद्यार्थ्यांनी समाजकार्यासाठी लावला आहे. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील अंधशाळा आणि सांगरूळ येथील उमेद फाउंडेशन या दोन संस्थांना सीसीटीव्ही आणि लोखंडी तिजोरी देऊन त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला. आपण काही मिळवत असताना समाजाचासुद्धा आपण विचार केला पाहिजे, या भावनेतून ही संकल्पना त्यांनी डोक्यात आणली आणि जेवढी विद्यार्थ्यांनी नफ्यातील रक्कम गोळा केली, तेवढीच रक्कम जे. के. वेल्थकडून देण्यात आली आणि वस्तू स्वरूपात दोन्ही संस्थांना भेट देण्यात आली.
विद्यार्थ्यांना शेअर मार्केटिंगचे शिक्षण : कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर येथील जे.के वेल्थ या कंपनीमार्फत शेअर मार्केट गुंतवणूक आणि त्याचे क्लासेस घेतले जातात. गेली अनेक वर्षे जे. के. वेल्थ ही कंपनी कोल्हापुरात कार्यरत आहे. जे. के. वेल्थतर्फे घेण्यात येणाऱ्या टेक्निकल एनालिसिस क्लासेसमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसंदर्भात प्रात्यक्षिक दिले जातात.
प्रात्यक्षिकात मिळवला फायदा : विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिका वेळी शेअर मार्केटमधून काही प्रमाणात फायदा कमावला होता. या मिळालेल्या रकमेचे काय करायचे या विचारातून आपण या रकमेतून चांगले समाजकार्य करूयात, असा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांच्या या निर्णयामुळे जेके वेल्थ कंपनीचे डायरेक्टर हेमंत शहा यांनीही जेवढी रक्कम विद्यार्थ्यांनी फायदा स्वरूपात कमावली आहे आहे तेवढीच रक्कम जेके वेल्थकडून या समाजकार्यात दिली जाईल, असा निर्णय घेतला व या दोन्ही माध्यमातून मोठी रक्कम उभी राहिली.
दोन संस्थांना सीसीटीव्ही : या रकमेतून मिरजकर तिकटी येथील अंधशाळा व सांगरूळ येथील उमेद फाउंडेशन या दोन्ही संस्थांना सीसीटीव्ही व लोखंडी तिजोरी देण्यात आल्या. यावेळी जेके वेल्थचे हेमंत शहा, अनुज पाटील,अक्षय पारेख, मुख्याध्यापक पाटील, टेक्निकल ऍनालिसिस क्लासचे सर्व विद्यार्थी, अंधशाळेचे अध्यक्ष डॉ. सुहास बोंद्रे उमेद फाउंडेशनचे प्रकाश गाताडे, शेखर पाटील, दर्शन शहा उपस्थित होते.
माणुसकीचे दर्शन : जे. के. वेल्थच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा घडवले माणुसकीचे दर्शन, गेले अनेक महिने कोल्हापुरात शेअर मार्केटमधील फसवणुकीची अनेक प्रकरणे गाजत आहेत. यामध्ये बऱ्याच लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पण अशा परिस्थितीत शेअर मार्केट शिकताना मिळालेले पैसे आपण समाजकार्याला द्यायचे, असा निर्णय घेऊन जेके वेल्थचे सर्व विद्यार्थी व हेमंत शहा यांनी पुन्हा एकदा कोल्हापुरात माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले.