कोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे असेल तर सर्व स्तरावर संघटित होणे आवश्यक आहे. राजकीय लोकप्रतिनिधींनी एकत्र होऊन संघटित न्यायालयीन लढा बळकट करण्याची आवश्यकता आहे. तसेच राजकीय इच्छा शक्तीच्या बळावर मराठा समाजाला न्याय मिळू शकतो, अशी प्रतिक्रिया श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी दिली.
पुढे श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, 'सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याची कल्पना मला होतीच. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. जर मराठा समाजाला न्याय मिळवायचा असेल तर संघटीत राहून न्यायालयीन लढाई करण्याची आवश्यकता आहे. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला. त्या निर्णयावर अभ्यास करून महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिधींनी याच्यावर विचारविनिमय केले पाहिजे. आमदार-खासदारांनी विधानसभेत, लोकसभेत यावर विचारविनिमय करून हे प्रश्न संसदेत उपस्थित केले पाहिजेत. जोपर्यंत संसदेत याबद्दलचे महत्व पटवून सांगितले जात नाही तोपर्यंत हा निर्णय अधांतरीच राहील.'
जेव्हा मराठा आरक्षणाबाबत संसदेत विचार पटवून सांगितला जाईल आणि कायदेशीर निर्णय करून घेतला जाईल, तेव्हा आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. यावर महाराष्ट्र सरकारने केंद्रापर्यंत आवाज पोहोचवला पाहिजे, असे मतही शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केलं.
केंद्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत पुढाकार घेउन निर्णय घ्यायला हवा, केंद्र सरकार आपल्या बाजूने निर्णय कसे देईल? व देशातील सर्वच राज्यांनी एकत्र येऊन यावर कसा निर्णय घेता येईल? या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे, असेही श्रीमंत शाहू महाराज म्हणाले. दरम्यान, आज सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.
हेही वाचा - उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन
हेही वाचा - आरक्षण रद्दचा निर्णय मराठा समाजासाठी दुर्दैवी - संभाजीराजे भोसले