कोल्हापूर - सीमाभागातील मराठी भाषिकांवर राजद्रोहचे खटले त्वरित मागे घेण्याच्या मागणीसाठी शिवसेना कोल्हापूर ते बेळगांव असा दांडी मार्च काढणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे. 22 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता कोल्हापुरातून ही दांडी मार्च निघेल असंही त्यांनी यावेळी सांगितल आहे. तर कर्नाटक पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यास विरोध मोडून कर्नाटकात घुसणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी कर्नाटकातील बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही कन्नड गुंडांनी शाई टाकत विटंबना केली होती. यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रसह कर्नाटक सीमाभागात देखील पाहायला मिळाला होता.सीमाभागातील मराठी बांधवांनी लोकशाही मार्गाने निषेध नोंदवत आंदोलन केले. मात्र कर्नाटक सरकारने या सीमावासीय 61 मराठी बांधवावर बेळगाव येथे राज्यद्रोहाचे आणि कलम 307 प्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबले आहे. तर त्यांना अद्याप ही जामीन मिळाला नाही.तसेच काही जणांच्या कुटुंबावर देखील दबावतंत्राचा वापर करत धरपकड सुरू आहे. कर्नाटक सरकारने राजद्रोहचे, हे खटले त्वरित मागे घेण्याच्या मागणी महाराष्ट्रातून आता सातत्याने होत आहे.
दरम्यान आता शिवसेनेच्या वतीनं देखील कोल्हापूर ते बेळगांव असा दांडी मार्च काढण्यात येणार असल्याचं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं आहे. 22 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता कोल्हापुरातील टाऊन हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक घालून कोल्हापुर ते बेळगाव मराठी भाषिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान दांडी मार्च तुरुंग मुक्ती आंदोलन निघणार आहे. यामध्ये हजारो शिवसैनिक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजां या मूर्तीला भगव्या पालखीत विराजमान करून कागल मार्गे सीमाभागात जाऊन तेथे पाच नद्यांचे पाणी आणून दुग्धाभिषेक घालण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा युवासेना प्रमुख मंजीत माने, विराज पाटील,वैभव जाधव, अमित सोलापुरे आदी उपस्थित होते.
कर्नाटक पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यास विरोध मोडून कर्नाटकात घुसणार
गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चालू आहे. कर्नाटकात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने वेगवेगळी आंदोलनात करण्यात येतात. मात्र या कार्यकर्त्यांना आणि मराठी सीमा भागातील लोकांना कर्नाटक सरकार सदैव अन्याय करत असल्याचे आरोप होत असतात. यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेच्यावतीने वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करत कर्नाटकात जाण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र कर्नाटक पोलीस त्यांना सीमेवरच रोखून त्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवले जाते. मात्र या वेळेस जर कर्नाटक पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तर विरोध मोडून कर्नाटकात आम्ही घुसणार असा इशारा जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.