कोल्हापूर - दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात रविवारी 'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली. या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. कोल्हापुरमध्येही शिवसेनेन निदर्शने केली. यासाठी शहरातल्या शिवाजी चौकात शिवसैनिक एकत्र आले होते. यावेळी पुस्तक प्रकाशनाच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारुन जोरदार घोषणाबाजी केली. या पुस्तकावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणीही करण्यात आली.
हेही वाचा- 'वाडिया'ला जीवनदान द्या; कर्मचारी आणि कामगार युनियनचे रुग्णालयाबाहेर धरणे
दुसरीकडे शिवसेनेच्या दुसऱ्या गटाकडून सुद्धा जयभगवान गोयल यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले. शिवाय गोयल यांना देशद्रोही घोषित करावे, अशी मागणी सेनेकडून करण्यात आली.
दरम्यान, छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याबद्दल येथील युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे बिंदू चौकात दहन करण्यात आले. भाजपकडून समाजात तेढ निर्माण सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडावर येऊन महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा भाजपला सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा युवक काँग्रेसकडून देण्यात आला.