कोल्हापूर - दरवर्षी शहरात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी कोल्हापुरातील शिवाजी चौक इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवभक्तांनी शिवप्रतिमेला अभिषेक घालून अभिवादन केले.
किल्ले रायगडवर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने मावळे रायगडला जातात. यंदा मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मावळ्यांना रायगडवर जाता आलेले नाही. त्यामुळे येथील शिवाजी चौक परिसरात पार पडणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होत अनेकांनी अभिवादन केले. यावेळी शिवरायांच्या शौर्याची गाथा मांडणाऱ्या पोवाड्यांचे सुद्धा सादरीकरण झाले.
या वेळी, शिवप्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी,’ ‘हर हर महादेव,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी शिवाजी चौक परिसर दणाणून गेला. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटीलही शिवाजी चौक येथील शिवाजी पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.