कोल्हापूर - येथील शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाच्या शेडमध्ये गुरुवारी तब्बल साडे सहा फूट लांबीचा नाग आढळून आला. त्याच अधिविभागातील कर्मचारी बबन चौगले यांच्या हा नाग निदर्शनास आला. त्यांनी मोठ्या धाडसाने त्याला पकडले.
हेही वाचा- केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीने प्रिन्सचा अखेर मृत्यू, आधी गमावला होता हात
पकडलेला नाग त्यांनी सुरक्षितस्थळी नेऊन सोडला. निसर्ग संपन्न असलेल्या शिवाजी विद्यापीठ परिसरात यापूर्वीसुद्धा अनेक साप सापडले आहेत. पण पहिल्यांदाच इतका मोठा नाग पाहायला मिळाला. त्यामुळे चौगले यांनी पकडलेल्या साडेसहा फूट नागासोबतचा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची संख्या आहे. पावसाळ्यात तर विद्यापीठ परिसरात फिरताना आपण जंगलात फिरत असल्याचा भास व्हावा इतकी हिरवळ पसरलेली दिसते. या परिसरात मोरांचीही संख्या लक्षणीय आहे. भरपूर मोर विद्यार्थी वसतिगृह आणि त्याच्या जवळपासच्या अधिविभागांच्या आवारात फिरताना दिसतात.