कोल्हापूर - कर्नाटक विरोधात कोल्हापुरातील शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्या कन्नड व्यवसायिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवावेत, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेने पुणे-बंगळुरू महामार्गावर कर्नाटक पासिंग असलेली वाहन रोखली. त्यावर जय महाराष्ट्र असे लिहण्यात आले. जोपर्यंत बेळगाव महापालिकेत समोरील बेकायदेशीर ध्वज उतरवत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा लढा सुरूच राहील, असा इशारा जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला आहे.
मराठी भाषिकांमध्ये संताप-
कर्नाटक मधील कन्नड रक्षण वेदिकेने मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. बेळगाव महापालिकेसमोर लाल पिवळा झेंडा लावल्याने मराठी भाषिकांमध्ये संताप आहे. हा ध्वज उतरविण्यात यावा अशी मागणी मराठी भाषिकांनी केली आहे. वारंवार त्याबाबत शिवसेना आवाज उठवत आहेत. हा ध्वज उतरावा या मागणीसाठी शिवसेनेने शनिवारी महाराष्ट्रातील कन्नड व्यवसायिकांना व्यवहार बंद करण्याचा इशारा दिला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यातील कन्नड व्यवसाय बंद राहतील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज कर्नाटक सरकारला जाग करण्यासाठी पुणे-बेंगलोर महामार्गावर कर्नाटक पासिंग असलेली वाहने आज शिवसेनेने रस्त्यावर उतरून रोखली. त्या वाहनांवर जय महाराष्ट्र, असे लिहून कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा थयथयाट-
गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकात कन्नड रक्षण वेदिकेच्या या संघटनेने महाराष्ट्राच्या खास करून शिवसेनेच्या विरोधात रान उठविण्यास सुरुवात केली आहे. तर दुसर्या बाजूला महाराष्ट्रातील शिवसेनेनं कर्नाटक सरकारच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. जोपर्यंत बेळगाव महानगरपालिका समोरील ध्वज उतरत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका शिवसेनेने यापूर्वीच दिली आहे. त्याचे पोटशूळ कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेला उठल्याने दररोज महाराष्ट्र राज्याला डीवचण्याचे देण्याचं काम या संघटनेकडून होत आहे. गुरुवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेने बेळगाव चौकात ध्वज लावण्याचा प्रयत्न करून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा- मंत्रालयातील वीज पुरवठा सुरळीत; ७ मिनिटात पुरवठा पूर्वपदावर आणल्याचा बेस्टचा दावा