कोल्हापूर: येत्या १४ नोव्हेंबर रोजी शिवाजी विद्यापीठातील सिनेट निवडणूक होणार असून या निवडणुकीमध्ये पदवीधर विभागातील १० जागेवर निवडणूक लढण्याचा निर्णय शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) घेतला आहे. सिनेटच्या पदवीधर गटातील 10 जागा शिवसेनेतर्फे लढविण्यात येतील, अशी घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. युवा सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काम केले आहे. शिवसेनेतर्फे जवळपास 9000 पदवीधरांची नोंदणी केली आहे. येत्या निवडणुकीत पदवीधर गटातील सगळ्या जागा शिवसेनेतर्फे लढवू आणि जिंकू असे संजय पवार म्हणाले आहेत.
निवडणुकीत प्रचंड चुरशीची राहणार: सिनेट निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी 22 ऑक्टोंबर रोजी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत. युवा सेना विस्तारक डॉ.सतीश नरसिंग यांनी निवडणुकीसंबंधी सूचना केल्या होत्या. इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठांच्या मान्यतेने पॅनेलची घोषणा करण्यात येईल, असे संजय पवार यांनी स्पष्ट केले आहे. पदवीधर मधील 10 जागापैकी कोल्हापूर जिल्ह्यासाठी 4 जागा सांगली आणि सातारा जिल्ह्यासाठी प्रत्येकी 3 जागा या पद्धतीने उमेदवारांचे वाटप होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा सामना हा सुटा, संभाजी ब्रिगेड, विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यार्थी विकास मंच यांच्याशी होणार असल्याने यंदाची सिनेटची निवडणुकीत प्रचंड चुरशीची होणार आहे.
यांची उपस्थिती: मात्र तरीही विजय हा आमचाच होणार असा विश्वास संजय पवार यांनी व्यक्त केला आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, समन्वयक हर्षल सुर्वे, मंजित माने, अमृता सावेकर, विनायक जाधव, वैभव जाधव, अवदेश करंबे, कमलाकर जगदाळे, सुशील भांदिगिरे, अनिल पाटील, जयसिंग टीकिले, संतोष आयरे, प्रसाद पोवार, संतोष कांदेकर, किशोर दाभाडे, विनय क्षीरसागर, राहुल माळी, जयराम पोवार, युवराज मोरे, अवधूत पाटील, रवींद्र पाटील, सागर मावके, सुरेश पाटील, रितेश खोत उपस्थित होते.