कोल्हापूर : फरी म्हणजे चामड्याची ढाल आणि गदका म्हणजे तलवारीच्या लांबीची काठी होय. खरंतर पूर्वी शिवरायांच्या काळात जे सैनिक लढाईसाठी आधी सराव करायचे तेव्हा मावळ्यांना जखमा कमी व्हाव्यात, यासाठी हा खेळ खेळला जायचा. तलवार आणि ढालऐवजी काठीने सराव करायचे. त्यामुळे युद्धकलेच्या सरावासाठीच या खेळाची सुरुवात झाल्याचे दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
फरी गदकाच्या स्पर्धा : हीच कला पुढे जाऊन खेळाच्या रुपात सुद्धा खेळू लागले. त्याकाळी खेळाडूच्या काठीच्या टोकाला कापडाचा बोळा लावून तो चुन्यात बुडवला जायचा. फरी गदका खेळताना विरोधी खेळाडूच्या अंगावर जिथे जिथे फटका बसायचा, तिथे चुन्याचा पांढरा डाग उठायचा. त्यामुळे गुणांकन करणे सोपे व्हायचे. कोल्हापुरात मिरजकर तिकटी आणि खराडे कॉलेज येथे फरी गदका खेळाच्या स्पर्धा व्हायच्या. कुस्तीसारखेच प्रेक्षक हे सामने बघायला यायचे आणि याची मजा घ्यायचे.
कालांतराने खेळ बंद : जुन्या पद्धतीप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत काठीच्या वाराचे ८० प्रकार आहेत. त्याचे त्याप्रमाणे गुणांकन केले जात होते. नंतरच्या काळात या खेळाचे परीक्षक मृत झाल्यामुळे गुणांकन कसे करायचे, कोणाला माहिती नसल्याने आणि अनास्थेमुळे हा मैदानी क्रीडा प्रकार बंद पडला. आता मात्र मोजक्याच शिवप्रेमी आणि मर्दानी खेळ खेळणाऱ्या मावळ्यांनी हा खेळ जिवंत ठेवला आहे. आजही अनेक मर्दानी खेळांच्या कार्यक्रमात याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळते. मात्र ज्या मोठ्या स्वरूपात स्पर्धा होत होत्या. त्या आता होत नसल्याची खंत अनेकजण व्यक्त करत आहेत.
शाहू महाराजांचे योगदान : या खेळाचे नियम सुद्धा अनेक होते. आपल्या पूर्वजांना याबाबत खुपच काळजी घेतल्याचे दिसते. कारण त्यांनी सर्व नियम अगदी पुस्तक रुपात करून ठेवले आहेत. १९२० ते १९४० मध्ये या खेळावर बरेच संशोधन होऊन त्याचे पुस्तकरूपात प्रकाशन झालेले आहे. विशेष म्हणजे हा खेळ टिकावा, म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९१७ साली शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश केला होता. एव्हढेच काय तर शिक्षकांना पगारवाढ आणि बढती दिली होती. त्यांना हा वारसा जतन करण्याचे महत्व तेव्हाच समजले होते.
अभ्यासक्रमात समावेश करावा : मोठ्या साम्राज्यांना हरवून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्यासोबतच हि युद्धकला क्रीडा अभ्यासक्रमात असेल तर आपल्या पूर्वजांचा शौर्याचा वारसा जतन केला जाईल. मुलांना प्रेरणा मिळेल. आमच्या काठी फिरवणाऱ्या मुलांना शाळेत इतर खेळाला मिळतात. तसे ५, १० ‘ग्रेस मार्क’ दिले गेले पाहिजे. असे केल्यास या खेळाला आपोआप प्रतिष्ठा मिळेल. तो जपला जाईल. शिवाय २०२३ हे छत्रपती शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्षही आहे. हा खेळ शालेय क्रीडा अभ्यासक्रमात आला, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या दोन महामानवांना या सरकारने दिलेली ही सगळ्यात मोठी मानवंदना ठरेल, अशी अपेक्षा वारसा डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी केली आहे.