कोल्हापूर Shardiya Navratri 2023 : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या (Karveer Nivasini Ambabai) शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी (Navratri 2023) घटस्थापनेपासून प्रारंभ होत आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हा प्रशासन, कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं यंदा नेटकं नियोजन करण्यात आलं आहे. नवरात्रोत्सव काळात देशभरातील सुमारे वीस लाख भाविक मंदिराला भेट देतील अशी माहिती मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली.
दर्शन रांगेचा मंडप उभारण्यात आला : करवीर निवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात रविवारपासून होत असल्यानं, देवस्थान समितीच्या वतीनं यंदा प्रथमच मंदिर परिसर ते शेतकरी संघाच्या इमारतीपर्यंत दर्शन रांगेचा मंडप उभारण्यात आला आहे. 'ऑक्टोबर हिट' उन्हाच्या तडाख्यामुळं संपूर्ण मंडपात ध्यान आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थान समिती सज्ज असल्याचं महादेव दिंडे यांनी सांगितलं.
85 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा असणार 'वॉच' : मंदिराच्या सुरक्षेच्या विचार करून आणि येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी देवस्थान समितीच्या वतीनं संपूर्ण मंदिर परिसरात 85 सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचा वॉच मंदिर परिसरात घडणाऱ्या सर्व हालचालींवर असणार आहे.
वैद्यकीय पथक तैनात : भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी देवस्थान समिती आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं अंबाबाई मंदिर परिसरात रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. वैद्यकीय सोय देखील मंदिर परिसरात करण्यात आली आहे.
अशी असणार नऊ दिवसांची सालंकृत पूजा : रविवारी घटस्थापनेच्या दिवशी आई अंबाबाईची पारंपारिक बैठकी पूजा बांधण्यात येणार आहे. यानंतर अनुक्रमे श्री महागौरी, श्री कामाक्षी देवी, श्री कृष्मांडादेवी, पारंपारिक गजारुढ, श्री मोहिनी अवतार, श्री नारायणी नमोस्तुते, पारंपारिक महिषासुरमर्दिनी, श्री दक्षिणामूर्तीरुपीणी यांसह विजयादशमी दिवशी देवीची पारंपारिक रथारुढ रुपात सालंकृत पूजा बांधण्यात येणार आहे.
हेही वाचा -